खुनप्रकरणी नंदुरबार न्यायालयाकडून महिलांना एक वर्षाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 11:49 IST2019-02-27T11:49:49+5:302019-02-27T11:49:53+5:30
नंदुरबार न्यायालय : नांदरखेडा येथे घडली होती घटना

खुनप्रकरणी नंदुरबार न्यायालयाकडून महिलांना एक वर्षाची शिक्षा
नंदुरबार : खुनाचा आरोप असलेल्या दोन्ही महिलांना नंदुरबार जिल्हा सत्र न्यायालयाने १ वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे़ अनैतिक संबंधातून खूनाची घटना घडली होती़
नांदरखेडा येथील शिवा देसाई याचे गावातीलच अनिताबाई टिमक्या वसावे हिच्यासोबत अनैतिक संबंध होते़ यात अनिताबाई आणि तिची आई बेबीबाई वसावे ह्या दोन्हीही शिवा देसाई याच्याकडून ट्रॅक्टर, दोन एकर शेती आणि शुगर कारखान्यातून मिळणारे कमीशनची मागणी करत होत्या़ यास शिवा देसाई याने नकार दिल्यानंतर त्यास नांदरखेडा शिवारात मारहाण केली होती़ लाथाबुक्क्यांनी झालेल्या मारहाणीतून शिवा देसाई याचा मृत्यू झाला होता़ याप्रकरणी सुरेश शिवा देसाई यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन दोघी महिलांविरोधात गुन्हा दाखल होता़ दोषारोपपत्र पोलीस निरीक्षक विठ्ठल मोहकर यांनी दाखल केले होते़ याप्रकरणी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश राजेश गुप्ता यांनी दिलेल्या निकालानुसार दोघा महिला आरोपींना १ वर्ष कारावास आणि प्रत्येकी २ हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे़
न्यायालयाने दोघा महिलांना केवळ मयत शिवा देसाई यांना मारहाण करण्याची शिक्षा दिली असून खुनाच्या गुन्ह्यातून त्यांची निर्दोेष मुक्तता केली आहे़ खटल्याकामी अभियोग पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड़ सुशील पंडीत यांनी काम पाहिले़ पोलीस अधिक्षक संजय पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी तत्कालीन पोलीस निरीक्षक विठ्ठल मोहकर व अॅड़ सुशील पंडीत यांचा गौरव केला आहे़