हेरिटेज इमारतींचे हब बनतेय नंदुरबार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:21 IST2021-07-21T04:21:21+5:302021-07-21T04:21:21+5:30

निसर्ग सौंदर्य आणि आदिवासी परंपरा, संस्कृतीने नटलेले नंदुरबार आता हेरिटेज इमारतींचे हबही होऊ पाहत आहे. इंग्रजांच्या काळातील रेल्वे स्टेशनचा ...

Nandurbar becomes hub of heritage buildings! | हेरिटेज इमारतींचे हब बनतेय नंदुरबार!

हेरिटेज इमारतींचे हब बनतेय नंदुरबार!

निसर्ग सौंदर्य आणि आदिवासी परंपरा, संस्कृतीने नटलेले नंदुरबार आता हेरिटेज इमारतींचे हबही होऊ पाहत आहे. इंग्रजांच्या काळातील रेल्वे स्टेशनचा पारंपरिक लूक बदलला गेला आहे. दीडशे वर्षांच्या नगरपालिका इमारतीला आता नवीन साज चढत आहे. न्यायदानासाठी असलेल्या ब्रिटिशकालीन इमारतीच्या जागी आता अत्याधुनिक इमारत उभी राहिली आहे. कधी काळी नजरेतही न भरणारी दोन राज्यांत विभागलेली नवापूर रेल्वे स्थानकाची इमारत पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. आता नव्याने होऊ घातलेल्या मेडिकल कॅालेजची इमारतही त्याच दृष्टीने उभारली जाणार आहे.

देशात केवळ तीनच रेल्वे स्थानके

नंदुरबार रेल्वे स्थानकाची इमारत साधारणत: १०० पेक्षा अधिक वर्षे जुनी आहे. ब्रिटिशकालीन असलेली ही इमारत नंंदुरबारचे वैभव आहे. नंदुरसारख्या आदिवासी भागात रेल्वे स्थानक असणे ही त्या काळी कुतूहलाची बाब होती. त्यामुळे पर्यटनाचे हे एक केंद्रही झाले होते. लहानपणी अनेकांना त्यांचे आई-बाब, आजी-आजोबा या ठिकाणी फिरावयास नेत होते. त्यामुळे प्रत्येकाच्या स्मृतींशी रेल्वे स्थानकाची इमारत जुळली गेल्याने, ती आहे तशीच ठेऊन तिचे आधुनिकीकरण करावे, यासाठी खासदार डॉ.हिना गावीत आग्रही होत्या. नवीन इमारतीसाठी आलेला निधी त्यांनी याच इमारतीच्या आधुनिक सोईसुविधांसाठी वापरण्याच्या सूचना करून, ही इमारत आहे त्याच स्वरूपात नवीन लूक देऊन राहू द्यावी, अशी मागणी त्यांनी रेल्वे मंत्रालयाकडे केली. ती मंजूरही झाली आणि नंदुरबारचे रेल्वे स्थानक एक हेरिटेज स्वरूपात पुढे आले. देशात अशा प्रकारच्या ब्रिटिशकालीन इमारती असलेल्या रेल्वे स्थानकांमध्ये केवळ तीनच स्थानके असून, त्यात नंदुरबार एक आहे. नंदुरबारकरांच्या दृष्टीने ही गौरवाची बाब आहे.

हायकोर्ट इमारतीला लाजवेल, अशी जिल्हा न्यायालयाची इमारत...

जिल्हा न्यायालयाची इमारतही आधुनिक स्वरूपात तयार करण्यात आली आहे. राज्यस्तरीय आणि देशपातळीवरील जे नेते नंदुरबारात येतात व जे ही इमारत पाहतात, ते कौतुक केल्याशिवाय राहत नाहीत. हायकोर्टाचीही इमारत नाही, अशी इमारत जिल्हा न्यायालयाची असल्याचे शब्द आपसूकच त्यांच्या तोंडातून निघतात. तीनमजली असलेल्या या इमारतीत सर्व आधुनिक सुविधा आहेत. पक्षकार आणि कायदेविषयक तज्ज्ञ येथे आल्यावर त्यांना हे खरोखर न्याय मंदिर वाटावे, अशी भावना ठेवूनच या इमारतीची रचना आणि उभारणी करण्यात आली आहे, अन्यथा न्यायालय आणि त्याचा परिसराचा वेगळा अनुभव पक्षकारांना नेहमीच आलेला असतो. तो या ठिकाणी येत नाही, अशी प्रतिक्रिया अनेकांची असते. पूर्वी नंदुरबार शहरातील मध्यवर्ती भागात न्यायालयाची ब्रिटिशकालीन इमारत होती. दाटीवाटीने असलेल्या या ठिकाणी अनेक अडचणी होत्या.

पालिकेची आधुनिक इमारत

नंदुरबार पालिकेची आधुनिक इमारत न्यायालयाच्या जुन्या जागेवर आकार घेत आहे. साधारणत: ३० कोटी रुपये खर्चाची ही दोन मजली इमारत आहे. इमारतीला आधुनिक रूप देताना, स्थानिक कला, संस्कृतीचाही आणि इतिहासाचा टच देण्याचा प्रयत्न राहणार आहे. त्या दृष्टीने इमारतीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. खान्देशात अ वर्ग नगरपालिका इमारतींमध्ये नंदुरबार पालिकेची इमारत एकमेव राहील, या दृष्टीने प्रयत्न राहणार आहेत. इमारतीसाठी मध्यवर्ती ठिकाणी जागा मिळाल्याने, नंदुरबारकरांच्या दृष्टीने ते वैभव आणि आकर्षणाचे ठिकाण राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आगामी काळात पालिकेच्या कार्यक्षेत्राचा विस्तार वाढण्याची शक्यता आहे. शिवाय अ वर्ग नगरपालिका पुढे क वर्ग महापालिका होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने इमारतीचा आकार व विस्तार ठेवण्यात आला आहे.

वैद्यकीय महाविद्यालय : आरोग्य मंदिर

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबारात सुरू झाले आहे. महाविद्यालय इमारत, ५०० बेडचे रुग्णालय आणि प्रशासकीय इमारतीसाठी शासकीय जागा टोकरतलाव रस्त्यावर उपलब्ध झाली आहे. इमारती बांधकामासाठी ५३२ कोटी ४१ लाख रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. ही इमारतही हेरिटेज स्वरूपातच राहावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महाविद्यालय व रुग्णालय आरोग्य मंदिर व्हावे, या दृष्टीनेच इमारतींचा आराखडा तयार करण्यासाठी खासदार डॉ.हिना गावीत व पालकमंत्री के.सी.पाडवी यांचा प्रयत्न राहणार आहे, तसे सुतोवाच या दोघांनी यापूर्वीच केले आहे.

सारंगखेडा येथील अश्व संग्रहालय व अश्व प्रशिक्षण केंद्र भाजप सरकारच्या काळात मंजूर झाले आहेत, परंतु सद्या ते रेंगाळले आहेत. या दोन्ही इमारतीही स्थानिक अश्वबाजार आणि त्या अनुषंगाने असलेल्या परंपरांच्या टच असलेल्या राहतील, या दृष्टीने त्यांचाही आराखडा तयार करण्यात आला होता. त्या कधी आकारास येतील, याची उत्सुकता आहे.

- मनोज शेलार, नंदुरबार.

Web Title: Nandurbar becomes hub of heritage buildings!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.