सीमावर्ती भागात प्रवासबंदी नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:27 IST2021-04-26T04:27:24+5:302021-04-26T04:27:24+5:30

ब्राह्मणपुरी/नवापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातून बाहेर जाणारे व येणारे प्रवासी यांना बंदी करण्यात आली आहे. यातून तब्बल १२ ठिकाणी ...

In the name of travel ban in border areas | सीमावर्ती भागात प्रवासबंदी नावालाच

सीमावर्ती भागात प्रवासबंदी नावालाच

ब्राह्मणपुरी/नवापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातून बाहेर जाणारे व येणारे प्रवासी यांना बंदी करण्यात आली आहे. यातून तब्बल १२ ठिकाणी नाकाबंदी करुन पोलीस बंदोबस्त तैनात आहे. परंतु, ही जिल्हाबंदी नावालाच असून, खेडदिगर (ता. शहादा) येथील मध्यप्रदेश सीमेवर मात्र अशी कोणतीही बंदी नसल्याचे येथील नागरिकांच्या वावरावरुन दिसून येत आहे.

धुळे जिल्हा सीमेवरील चार ठिकाणांसह मध्यप्रदेश व गुजरात राज्यांच्या सीमेवर पोलीस बंदोबस्त तैनात करुन जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना अटकाव करण्यात येत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांना प्रवास बंदी करताना प्रशासनाने ई-पास देणेही बंद केले आहे. मात्र, असे असतानाही अनेकजण वैद्यकीय कारणांसाठी सध्या गुजरात राज्यात प्रवास करत आहेत. त्यांच्याकडील कागदपत्रांची तपासणी करुन त्यांना सोडण्यात येत असले, तरी इतर कारणांमुळे येऊ पाहणाऱ्या वाहनांना परत पाठविण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. खासकरुन नाशिक मार्गावर मोठा बंदोबस्त तैनात असूनही याठिकाणी प्रवासी वाहनांची गर्दी अधिक असल्याचे सांगण्यात आले.

१ सीमा; पाच कर्मचारी

खेड दिगर (ता. शहादा) हे गावच मध्यप्रदेश सीमेवर आहे. खेतिया व खेड दिगर या दोन गावांमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्यांमुळे प्रवासबंदी मोडली जात आहे. याठिकाणी पाच पोलीस तैनात आहेत.

मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र दरम्यान प्रवास करण्यासाठी अनेक रस्ते असल्याने नागरिक शेतशिवारातून वाहने घेऊन जिल्ह्यात येत असल्याची माहिती सीमावर्ती भागातून देण्यात येत आहे. मध्यप्रदेशातून रुग्णांची जिल्ह्यात वर्दळ सुरु झाल्याने आटोक्यात आलेला कोरोना फोफावण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

खेड दिगर व खेतिया या ठिकाणाच्या बाजारपेठेत रविवारी दोन महिला आणि तीन पुरुष पोलीस कर्मचारी नियुक्त होते. या कर्मचाऱ्यांना वाहनधारक जुमानत नसल्याचे समोर आले. याठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढीची अपेक्षा शहादा तालुक्यातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

गुजरात राज्य सीमेवर बेडकी (ता. नवापूर) येथील सीमा तपासणी नाक्यावर गुजरातमध्ये जाणारे तसेच तेथून परतणाऱ्या प्रवाशांची रॅपिड ॲन्टिजेन चाचणी करण्यावर भर देण्यात येत होता. यातून पाॅझिटिव्ह असलेल्यांना त्यांच्या जिल्ह्यात परत जाण्याचा सल्ला दिला जात होता.

बेडकी (ता. नवापूर) येथील सीमा तपासणी नाक्यावर गुजरात राज्यात जाणाऱ्या तसेच तेथून येणाऱ्या प्रत्येक वाहनाची सक्तीने तपासणी करण्यात येत असल्याचे दिसून आले. प्रादेशिक परिवहन विभागाचे मोटारवाहन निरीक्षक वाहनांमधील नागरिकांची माहिती घेत होते.

Web Title: In the name of travel ban in border areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.