नवापूर तालुक्यात मातेवर संशय घेत मुलाकडून एकाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 12:26 IST2017-12-08T12:22:41+5:302017-12-08T12:26:40+5:30
विष पाजून हत्या केल्याची घटना तब्बल आठ महिन्यांनंतर झाली उघड

नवापूर तालुक्यात मातेवर संशय घेत मुलाकडून एकाची हत्या
आॅनलाईन लोकमत
नंदुरबार,दि.८ : जन्मदात्या आईवर संशय घेत गावातीलच एकाचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करणाºयाला पोलिसांनी अटक केली आहे़ नवापूर तालुक्यातील थुवा येथे हा प्रकार बुधवारी उघडकीस आला़
रमण सिंगा गावीत (४९) यांचा मृतदेह २६ मार्च २०१७ रोजी थुवा शिवारातील नाल्याच्या विहिरीत आढळून आला होता़ याप्रकरणी नवापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. विष पिऊन त्याने आत्महत्या केल्याचा अंदाज त्या वेळी व्यक्त केला गेला होता़ मात्र पोलिसांना घटनास्थळ परिसर आणि मृतदेहावर आक्षेपार्ह असे अनेक परिस्थितीजन्य पुरावे आढळून आल्यानंतर त्यांनी या घटनेचा तपास सुरूच ठेवला होता़ दरम्यान, गावातील दिलीप रोग्या गावीत (वय ३५) याच्यावर पोलिसांना संशय आला़ त्याची चौकशी केल्यानंतर त्याने दिलेल्या जबाबात तफावत आढळल्याने पोलिसांनी त्याची गुप्त माहिती काढली.
त्यात त्यानेच खून केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बुधवारी त्याच्याविरोधात रायसिंग रमण गावीत याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली़ दिलीप गावीत याने २६ मार्च रोजी सायंकाळी शेतात जाणाºया रमण गावीत यांचा पाठलाग करून एकटे असल्याचा फायदा घेत हातातील कीटकनाशकाची बाटली त्याच्या तोंडात ओतली होती़
रमण गावीत यांचा मृत्यू झाल्याचे पाहून जवळील टॉवेल आणि शालमध्ये त्यांचा मृतदेह गुंडाळून जवळील नाल्याच्या विहिरीत मृतदेह फेकून दिला होता़ रमण गावीत यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसात नोंद करण्यात आली होती़
पाच दिवसांची पोलीस कोठडी
रमण गावीत याच्यासोबत आईचे प्रेमसंबंध असल्याचा संशय दिलीप गावीत यास होता़ त्याने या संशयातून रमण गावीत यांचा खून केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे़ कीटकनाशक पाजून मृतदेह विहिरीत फेकून देण्यापर्यंतची सर्व कामे दिलीप गावीत याने नियोजित कटानुसार केली असावीत असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे़ अटक करण्यात आल्यानंतर त्यास नवापूर न्यायालयात हजर करण्यात आले असता, पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ तपास सहायक पोलीस निरीक्षक डी़डी़पाटील करीत आहेत़