चौगाव येथे मोबाईल चोरीच्या संशयातून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 11:51 IST2019-05-03T11:50:44+5:302019-05-03T11:51:09+5:30
चौगाव येथील घटना : संशयीत दाम्पत्याला अटक

चौगाव येथे मोबाईल चोरीच्या संशयातून खून
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मोबाईल चोरल्याच्या संशयातून दाम्पत्याने एकास बांधून ठेवत बेदम मारहाण केल्याची घटना चौगाव, ता.तळोदा येथे ३० एप्रिल रोजी रात्री घडली. याप्रकरणी संशयीत दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे.
भाईदास रोहिदास ठाकरे (३७) रा.चौगाव, ता.तळोदा असे मयताचे नाव आहे. तर सुवर्ण भरत वळवी व मंगलाबाई सुवर्ण वळवी दोन्ही रा.चौगाव असे अटक करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत. पोलीस सूत्रांनुसार, ३० एप्रिल रोजी भाईदास ठाकरे याने सुवर्ण वळवी यांच्या घरातून मोबाईल चोरला असा संशय वळवी दाम्पत्याने घेतला. त्यावरून त्यांनी भाईदास ठाकरे यांना धरून आणत दोरीने बांधून ठेवले. काठ्यांने त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यात त्यांचा मृत्यू झाला.
याबाबत बाबू दगा ठाकरे, रा.चौगाव यांनी तळोदा पोलिसात फिर्याद दिल्याने संशयीत दाम्पत्य सुवर्ण वळवी व मंगलाबाई वळवी यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस उपअधीक्षक प्रकाश मेढे, पोलीस निरिक्षक नितीन चव्हाण यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. तपास फौजदार पाकळे करीत आहे. घटनेनंतर चौगाव गावात जमावाकडून खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी सुवर्ण वळवी यास मारहाण करण्यात आली होती़ रात्री घडलेल्या या प्रकारावेळी गावात तणाव निर्माण झाल्याने तळोदा येथून पोलीस मागवण्यात आला होता़ सुवर्ण वळवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन बाबू दगा ठाकरे, निराकार बाबू ठाकरे, रोहिदास दगा ठाकरे, गुलाब दगा ठाकरे, धनराज भाईदास ठाकरे, सुधाकर गुलाब ठाकरे, रमेश जाधव ठाकरे सर्व रा़ चौगाव यांच्याविरोधात तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ मारहाणीत सुवर्ण वळवी याच्या दातांना दुखापत झाल्याची माहिती देण्यात आली़