होर्डिंगच्या कमाईकडे पालिकेचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:28 IST2021-01-22T04:28:57+5:302021-01-22T04:28:57+5:30
नंदुरबार : शहरातील विविध चौक, रस्ते आणि रस्त्यांमधील दुभाजक यांच्यामध्ये लावण्यात येणाऱ्या बेकायदा होर्डिंग्जमुळे शहराचा चेहरा विद्रूप होत आहे. ...

होर्डिंगच्या कमाईकडे पालिकेचे दुर्लक्ष
नंदुरबार : शहरातील विविध चौक, रस्ते आणि रस्त्यांमधील दुभाजक यांच्यामध्ये लावण्यात येणाऱ्या बेकायदा होर्डिंग्जमुळे शहराचा चेहरा विद्रूप होत आहे. याबाबत पालिकेने संबधितांकडून कर वसुली करणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
नंदुरबारात कुणीही उठावे आणि वाढदिवस, अभिनंदन यांचे होर्डिंग्ज लावावे अशी स्थिती आहे. गल्लीछाप पुढारे देखील त्यातून निर्माण झाले आहेत. यामुळे मात्र, शहराचा चेहरा विद्रूप होत चालला आहे. मुख्य चौक, रस्ते आणि विद्युत पोलसह झाडांवर देखील असे होर्डिंग्ज सहज दिसून येतात. त्यासाठी पालिकेची कुठलीही परवानगी घेतली जात नाही. त्यामुळे पालिकेकडून कर वसुलीचा प्रश्नच येत नाही. अवैध होर्डिंग्जमुळे अनेकवेळा वादविवाद होऊन हाणामारीच्या घटना देखील घडल्या आहेत. असे असतानाही पालिका याबाबत गांभीर्याने घेत नसल्यामुळे होर्डिंग्ज लावणाऱ्यांचे फावले आहे. परिणामी होर्डिंग्ज व बॅनर यांचा सुळसुळाट दिसून येत आहे.
प्रशासनाच्या डुलक्या
पालिकेच्या मालकीच्या इमारींसह चौक सुशोभिकरण झालेल्या ठिकाणी देखील होर्डिंग्ज लावले जातात. तरीही पालिका त्यांच्यावर काहीही कारवाई करीत नाही.
महापुरूषांच्या पुतळ्यांच्या कठड्यांवर देखील होर्डिंग्ज, बोर्ड लावले जातात. अशामुळे काही वेळा पुतळाच झाकला जातो. शिवाय मुख्य सर्कलमधील समोरून येणारे वाहन अशा कारणांमुळे दिसून येत नसल्याने अपघातही होत आहेत.
पालिकेला होर्डिंग्जच्या माध्यमातून साधारणत: वर्षाला दोन लाखापर्यंत उत्पन्न मिळत असल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले. अर्थात ते पालिका हद्दीतील मोठे जाहिरात होर्डिंग्जच्या माध्यमातून मिळते. छोटे होर्डिंग्ज, बॅनर, फलक या माध्यमातून पालिकेला उत्पन्न शून्य असल्याचे दिसून येत आहे. वास्तविक परवानगी घेतानाच शुल्क वसूल करणे आवश्यक असते.