लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : इंधन दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकारच्या विरोधात रविवारी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षा हेमलता शितोळे यांच्या नेतृत्वाखाली चूल मांडून भाकरी बनवून अनोखे आंदोलन करण्यात आले. नंदुरबार शहराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हे आंदोलन करण्यात आले.गेल्या वर्षभरापासून सिलिंडरचे दर दिवसेंंदिवस वाढत असल्याने शहरातील धुळे चौफुली येथे सिलिंडर आणि बाजूला चूल मांडून आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने मोठमोठ्या घोषणा केल्या. मात्र त्यांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. केंद्र सरकार हे महिलाविरोधी असून त्या आनुषंगाने रविवारी राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे रस्त्यावर चूल मांडून व भाकरी बनवून अनोखे आंदोलन करीत केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनादरम्यान फिजकल डिस्टन्स व शासनाचे नियम पाळून केवळ ५० ते ६० महिलांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले. केंद्र शासनाने सिलिंडरचे भाव कमी केले नाही तर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाभर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महिला जिल्हाध्यक्ष हेमलता शितोळे यांनी दिला.
आंदोलनस्थळी पोलिसांतर्फे बंदोबस्त... वाघेश्वरी चौफुली ही २४ तास रहदारीची असते. महिलांच्या आंदोलनामुळे रहदारी ठप्प होऊ नये यासाठी नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे आंदोलनकर्त्या महिलांना चौफुलीवरील प्रवेशद्वार कमानीच्या बाजुला मोकळ्या जागेत त्यांना चूल मांडू देण्यास परवाणगी देण्यात आली होती. यावेळी पोलिसांचा मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैणात होता.