घरी वाट बघत होती आई पण त्याने गाठली सिताखाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 13:08 IST2021-03-02T13:08:50+5:302021-03-02T13:08:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : तोरणमाळ, ता. धडगाव येथील सीताखाईत उडी घेत युवकाने आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली होती. ...

घरी वाट बघत होती आई पण त्याने गाठली सिताखाई
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राह्मणपुरी : तोरणमाळ, ता. धडगाव येथील सीताखाईत उडी घेत युवकाने आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली होती. मृत युवक हा रविवारी सकाळी मध्यप्रदेशातील राखी या गावाहून वडिलांकडून १०० रुपये घेत घरातून बाहेर पडला होता. त्याच्या मृत्यूची माहिती मिळताच त्याचे नातेवाईक तोरणमाळ येथे दाखल झाले होते. यावेळी त्याची आई घरी वाट बघत असल्याचे सांगत नातेवाईकांनी हंबरडा फोडला होता.
राजेंद्र बलज्या पटले (वय २५) रा. राखी बुद्रूक (मध्यप्रदेश) असे मयताचे नाव आहे. रविवारी दुपारी तोरणमाळच्या सीताखाई पाँईटवर अंगात लाल शर्ट व पांंढरी जिन्स पॅन्ट परिधान केलेल्या युवकाने धावत जाऊन दरीत उडी घेतली. दरम्यान, उडी घेतली त्यावेळी जोरदार आरोळी मारल्याने परिसरातील जडी-बुटी विक्रेतेही मदतीला धावले होते. परंतु तोवर दरीत पडून युवकाचा मृत्यू झाला होता. मयत युवकाने आत्महत्येपूर्वी जडीबुटी विक्रेत्याकडे पाणी मागितले होते. यावेळी त्याने मध्य प्रदेशातील राखी-भासकी येथील असल्याची माहिती दिली होती. त्यातून पोलिसांनी शोध घेतल्यावर त्याची ओळख पटली. दरम्यान, रविवारी झालेल्या या प्रकारानंतर सीताखाईत उतरण्यासाठी साधने न मिळाल्याने सोमवारी दुपारी म्हसावद पोलीस ठाण्याचे तोरणमाळ पोलीस हेड कॉन्स्टेबल चंदू साबळे, दिलीप सूर्यवंशी, करमसिंग चौधरी यांच्या मदतीने तोरणमाळ येथील जीवन रावताळे व नागरिकांनी दरीत उतरून दुपारी दीड वाजेच्या सुमारास अथक परिश्रमानंतर मृतदेह बाहेर काढला.युवकाने सीताखाईत उडी घेत आत्महत्या केल्याची माहिती परिसरात पसरताच युवकाचे नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले होते. राजेंद्र पटले हा युवक रविवारी सकाळी वडिलांकडून १०० रुपये घेत घेऊन घरुन निघाला होता. तो तोरणमाळ येथे नेमका कसा पाेहोचला तसेच आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या घटनेमुळे तोरणमाळ परिसरात खळबळ उडाली आहे. तोरणमाळ येथे पर्यटकांची नेहमी गर्दी असते. या ठिकाणी खडकी पॉईंट, सीताखाई पॉईंट या आत्महत्येचे प्रकारही वाढत असल्याने चिंता वाढत आहेत.
रात्रभर मृतदेह दरीत अन् ग्रामस्थांचा पहारा
पोलीसांकडून मृतदहे बाहेर काढण्यासाठी साधनांची जुळवाजुळव केली जात असताना ग्रामस्थही मदत करत होते. रात्री अनेक जण सिताखाई पाॅईंट भागात थांबून होते. त्यांच्याकडून मृतदेह जंगली श्वापदे उचलून नेवू नयेत यासाठी लक्ष ठेवले जात होते. सोमवारी दुपारी पोलीस कर्मचारी व ग्रामस्थ दरीत उतरल्यानंतरही अनेक जण मदतीला धावून येत मदतकार्यात सहभागी झाले.