नाशिक विभागात नंदुरबार जिल्ह्यात मनरेगाचे सर्वाधिक मजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 12:25 IST2020-05-29T12:25:15+5:302020-05-29T12:25:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊनमुळे परराज्यात अडकलेले मजूर गावी परतल्याने या मजुरांना रोजगार देण्यासाठी प्रशासनाच्या प्रयत्नांना यश येत ...

नाशिक विभागात नंदुरबार जिल्ह्यात मनरेगाचे सर्वाधिक मजूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : लॉकडाऊनमुळे परराज्यात अडकलेले मजूर गावी परतल्याने या मजुरांना रोजगार देण्यासाठी प्रशासनाच्या प्रयत्नांना यश येत असून त्यामुळे मनरेगावरील कामांवरील मजुरांची संख्या तब्बल ५० हजाराच्या घरात गेली आहे. विशेष म्हणजे नाशिक विभागात जिल्ह्यात सर्वाधिक मजूर कामावर असल्याची नोंद झाली आहे.
परजिल्ह्यात आणि परराज्यात अडकलेले हजारो मजूर जिल्ह्यात परतू लागले आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील बहुतांश मजुर गुजरात राज्यात जातात गेल्या महिन्यातच हे मजूर परतल्याने १४ दिवसांच्या क्वॉरंटाईननंतर या मजुरांना रोहयोच्या कामांकडे वळविण्यात प्रशासनाला यश येत आहे. जिल्ह्यात रोजगाराची साधने नसल्याने आणि दारिद्रय रेषेखालील कुटूंबांची संख्या ७० टक्केपेक्षा अधीक असल्याने लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यातील जनतेला पुरेसे अन्नधान्य अथवा रोजगार उपलब्ध करून देणे प्रशासनापुढे आव्हान होते. ही बाब जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी लक्षात घेवून सुरुवातीपासूनच धान्य वाटप व रोहयोच्या कामांकडे लक्ष घालून त्याचे नियोजन केले.
मजूर परतण्यापूर्वीच सुमारे ६० हजार मजुरांना रोजगार मिळेल इतक्या कामांना तांत्रिक मंजुरी दिली होती. त्यामुळे मजूर परतल्यानंतर या मजुरांना ज्यांनी काम मागितले त्यांना काम देण्याला प्राधान्य दिले जात असल्याने अवघ्या तीन आठवड्यात रोहयोची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू झाली असून या कामांवरील मजुरांची संख्याही वाढली आहे.
सद्य स्थितीत जिल्ह्यात ४,३३० कामांवर ४६ हजार २९४ मजूर कामावर आहेत. लवकरच ही संख्या ५० हजारांवर जाणार आहे. तालुकानिहाय सुरू असलेली कामे व त्यावरील मजूर पुढील प्रमाणे, अक्कलकुवा तालुक्यात ६०७ कामांवर ७,८०१ मजूर कार्यरत आहेत. धडगाव तालुक्यात ४५० कामांवर १२,२३४ मजूर उपस्थित आहेत. नंदुरबार तालुक्यात ६६० कामांवर सहा हजार ४६ मजूर उपस्थित आहेत.
नवापूर तालुक्यात ७४१ कामांवर ९,१८० मजूर कार्यरत आहेत. शहादा तालुक्यात एक हजार ५३ कामांवर ६,६०८ मजूर कार्यरत आहेत. तर तळोदा तालुक्यात ८१९ कामांवर ४,२२५ मजूर कार्यरत आहेत. यात जॉबकार्ड नसलेले १४,९६० मजुरांचा समावेश आहे.
एकुण कामांवरील मजुरांची संख्या तब्बल ५० हजारापेक्षा अधीक जाणार आहे. जिल्हा प्रशासनाने ठेवलेल्या लक्षांकापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न आहे. मजुरांनी आपल्या परिसरातच काम उपलब्ध व्हावे यासाठी कामाची मागणी करावी असे आवाहन देखील जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
जिल्ह्यात मागेल त्याला काम देण्याचे नियोजन प्रशासनाने केले असून रोहयोच्या कामाचे पुर्वनियोजन केल्यामुळे आज मोठ्या प्रमाणावर मजुरांना काम देता येत आहे.
-डॉ.राजेंद्र भारूड, जिल्हाधिकारी.