जिल्ह्यात आज दीडशेपेक्षा अधीक लग्न समारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 12:17 IST2020-03-19T12:17:26+5:302020-03-19T12:17:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मार्च महिन्यातील १९ तारीख ही सर्वात मोठी लग्नतिथी असून पोलीस प्रशासनाकडे असलेल्या नोंदीनुसार १५८ ...

जिल्ह्यात आज दीडशेपेक्षा अधीक लग्न समारंभ
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मार्च महिन्यातील १९ तारीख ही सर्वात मोठी लग्नतिथी असून पोलीस प्रशासनाकडे असलेल्या नोंदीनुसार १५८ ठिकाणी लग्नसमारंभ आहेत. अशा लग्न समारंभांमध्ये कमीत कमी उपस्थिती राहावी व आवश्यक त्या उपाययोजना केल्या जाव्या अशा सुचना जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आल्या आहेत. आजचा दिवस प्रशासनासाठी मोठ्या कसोटीचा ठरणार आहे.
एकाच ठिकाणी जास्त गर्दी होऊ नये व त्यादरम्यान कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी प्रशासनाने सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. शाळा, महाविद्यालयांना सुट्टया देण्यात आल्या आहेत. परंतु खाजगी स्वरूपात आयोजित लग्न समारंभांवर प्रशासनाला नियंत्रण मिळविणे कठीण होऊन बसले आहे. पूर्वनियोजनानुसार १९ मार्च रोजी मोठ्या प्रमाणावर लग्न समारंभ आहेत. पोलिसांनी काढलेल्या माहितीनुसार, १५८ ठिकाणी लग्न समारंभ असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र त्यापेक्षा अधीक ठिकाणी गुरुवार, १९ रोजी लग्न समारंभ असण्याची शक्यता आहे.
खाजगी मंगल कार्यालये, सामाजिक सभागृहांमध्ये १९ तारखेनंतर लग्न समारंभ आयोजित करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. परंतु गुरुवारच्या लग्न समारंभांवर नियंत्रण ठेवणे मोठे जिकरीचे ठरणार आहे.
लग्न समारंभ आयोजक आणि स्वत: नागरिकांनी दक्षता घेवून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एकमेकांशी जास्त संपर्क होणार नाही याची काळजी घ्यावी. वेळोवेळी हात स्वच्छ धुवावे. खोकतांना आणि शिंकतांना रुमालचा वापर करावा. कमीत कमी उपस्थिती राहील याची काळजी घ्यावी.
लवकरात लवकर समारंभ कसा आटोपेल यासाठी प्रयत्न करावा. वृद्ध आणि लहान मुलं यांना गर्दीच्या ठिकाणापासून दूर ठेवावे किंवा त्यांना घराबाहेर पडू देवू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.