आरक्षणावरील स्थगिती त्वरित उठवावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 12:43 IST2020-09-19T12:43:17+5:302020-09-19T12:43:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी शासनाने तात्काळ प्रयत्न करण्यासोबत मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी ...

आरक्षणावरील स्थगिती त्वरित उठवावी
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी शासनाने तात्काळ प्रयत्न करण्यासोबत मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी शहादा तालुका मराठा समाजाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शहादा तालुका मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आलेल्या त्याचप्रमाणे प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांना देण्यात आलेल्या निवेदनाचा आशय असा : गेल्या काही काळात संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मराठा समाजातर्फे आरक्षण मिळविण्याकरिता व्यापक अशी आंदोलने करण्यात आली. त्यानंतर राज्य शासनाने मराठा समाजाला शैक्षणिक व नोकरीविषयक आरक्षण मंजूर केले. परंतु आरक्षणासंदर्भात न्यायालयीन लढा सुरु झाला आणि आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणास अंतरिम स्थगिती दिली आहे. या स्थगितीमुळे मराठा समाजात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून निराशाजनक परिस्थिती निर्माण झाली आहे .
मराठा समाज हा न्यायप्रिय असून न्यायप्रणालीचा आदर करणारा आहे. शासनाने मराठा समाजाच्या भावना समजून घ्याव्यात. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या प्रक्रिया मराठा समाजाचे आरक्षण कायम राहावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर सकल मराठा समाज क्रांती मोर्चाचे अनिल भामरे, अॅड.सरजू चव्हाण, डॉ.किशोर पाटील, देवाभाऊ बोराणे, विजय कदम, डॉ.चंद्रभान कदम, नीलेश मराठे, सागर मराठे, एन.डी. पाटील, समर करंके, गणेशराजे पाटील, शरद पाटील, कैलास सोनवणे, यांच्यासह मराठा समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
निकाल येईपर्यंत नोकर भरती करू नये
राज्यात आगामी कालावधीत होणाºया पोलीस भरती तसेच इतर शासकीय नोकरी भरती सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल येत नाही तोपर्यंत करू नये, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. शासनाने हा निकाल येण्याच्या आधी जर नोकर भरती केली तर मराठा समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आलेला आहे.