मान्सून जिल्ह्यात दाखल, परंतु पावसाचा पत्ताच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:21 IST2021-06-11T04:21:24+5:302021-06-11T04:21:24+5:30
नंदुरबार : हवामान विभागाच्या दाव्यानुसार जिल्ह्यात गुरुवारी मान्सून दाखल झाला. परंतु, जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस झाला नसल्याचे चित्र आहे. ...

मान्सून जिल्ह्यात दाखल, परंतु पावसाचा पत्ताच नाही
नंदुरबार : हवामान विभागाच्या दाव्यानुसार जिल्ह्यात गुरुवारी मान्सून दाखल झाला. परंतु, जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस झाला नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, ७५ ते १०० मि.मी. पाऊस झाल्याशिवाय आणि पुढील पावसाचा अंदाज घेऊनच शेतकऱ्यांनी पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभाग आणि जिल्हा कृषी विज्ञान केंद्रातर्फे करण्यात आले आहे.
नंदुरबार जिल्ह्यात मान्सूनची गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा लागून होती. अखेर गुरुवार, १० जूनला मान्सून दाखल झाला. तशी घोषणा हवामान विभागाने केली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत सात दिवस आधी मान्सून जिल्ह्यात दाखल झाला आहे. असे असले तरी जिल्ह्यात गुरुवारी पावसाचा शिडकावादेखील झाला नाही. केवळ दुपारी ऊन-सावलीचा खेळ सुरू होता.
सात दिवस आधी दाखल
जिल्ह्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत सात दिवस आधी मान्सून दाखल झाला आहे. गेल्या वर्षी १६ ते १७ जून दरम्यान मान्सून दाखल झाला होता. यावर्षी १० जूनलाच दाखल झाला आहे. त्यामुळे यंदा दमदार आणि सरासरी इतक्या पावसाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
कृषी व केव्हीकेचे आवाहन
भारतीय हवामान विभागाकडून १० जूनला संपूर्ण महाराष्ट्रासह जिल्ह्यातदेखील मान्सून दाखल झाला असे जाहीर करण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला असून, शेतकऱ्यांनी लागलीच पेरणीची घाई करू नये. पेरणीयोग्य ७५ ते १०० मि.मी. पाऊस झाल्यास आणि पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेऊन पेरणी करावी. पुढील अंदाज घेऊन पेरणी केली तर दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्यता कमी असते. मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी आता पेरणीपूर्व मशागतीची कामे आटोपती घेतली आहेत. बी-बियाणे खरेदीसह पेरणीची पूर्वतयारी केली आहे. मात्र, अद्यापही पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी तूर्तास पेरणी करणे टाळावे, असेही कृषी विज्ञान केंद्राच्या जिल्हा कृषी हवामान केंद्राने स्पष्ट केले आहे.