विनयभंग करणाऱ्याची होणार स्वॅब टेस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 12:04 IST2020-07-08T12:04:28+5:302020-07-08T12:04:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाबाधित युवतीचा विनयभंग करणाऱ्या ‘त्या’ वॉर्डबॉयला कोरोनामुळे अटक करणे पोलीसांना शक्य झालेले नाही़ संशयिताची ...

विनयभंग करणाऱ्याची होणार स्वॅब टेस्ट
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाबाधित युवतीचा विनयभंग करणाऱ्या ‘त्या’ वॉर्डबॉयला कोरोनामुळे अटक करणे पोलीसांना शक्य झालेले नाही़ संशयिताची चौकशी करण्यासह अटकेच्या कारवाईसाठी शहर पोलीस ठाण्याने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ रघुनाथ भोये यांना अर्ज करुन परवानगी मागितली आहे़
जिल्हा रुग्णालयाच्या कोविड कक्षात दाखल असलेली २० वर्षीय कोरोनाबाधित युवती ईसीजी काढण्यासाठी गेली असता, तेथे ड्यूटीवर असलेल्या वॉर्डबॉयने तिचा विनयभंग केला होता़ युवतीने दिलेल्या तक्रारी अर्जावरुन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे़ गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी तपास सुरू केला आहे़ परंतु या तपासाला कोरोनाने ब्रेक लावला आहे़ संशयित हा जिल्हा रुग्णालयात ड्यूटीवर आहे़ त्याला ताब्यात घेण्यापूर्वी पोलीसांना त्याची कोविड टेस्ट करुन घ्यावी लागणार आहे़ या टेस्टचा अहवाल आल्यानंतरही पोलीस प्रशासनाला किमान १४ दिवस वाट बघावी लागणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ या लांबलचक प्रक्रियेमुळे पिडितेला न्याय मिळेल किंवा कसे, याकडे लक्ष लागून राहणार आहे़ दरम्यान अद्याप संशयित आरोपी असलेला वॉर्डबॉय कोण हा प्रश्न अनुत्तरीत आहे़ युवतीचा ईसीजी काढणारा वॉर्डबॉय हा पीपीई कीटमध्ये असल्याने ओळख पटली नसल्याची माहिती देण्यात आली आहे़ यामुळे पोलीसांच्या तपासात अडथळे येत आहेत़ पोलीस उपनिरीक्षक प्रियदर्शनी थोरात ह्या गुन्ह्याचा तपास करत आहेत़
पोलीसांकडून जिल्हा शल्यचिकित्सकांना देण्यात आलेल्या पत्राला अद्याप उत्तर आलेले नसल्याची माहिती आहे़ शहर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाकडून संशयिताचा शोध घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयाच्या कोविड कक्षातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी तसेच हजेरी बुक, बायोमेट्रीक थंब आदींची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती आहे़