विनयभंग करणाऱ्यास सात वर्ष कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 12:24 IST2019-04-02T12:24:15+5:302019-04-02T12:24:32+5:30
शहादा न्यायालय : तेलखेडीचा सिपानपाडा येथे घडली होती घटना

विनयभंग करणाऱ्यास सात वर्ष कारावास
नंदुरबार : तरुणीचा विनयभंग करून अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस सात वर्ष सश्रम कारावास व दंडाची शिक्षा शहादा येथील अतिरिक्त सत्र जिल्हा न्यायालयाने सुनावली.
५ जून २०१७ रोजी धडगाव तालुक्यातील तेलखेडीचा सिपानपाडा येथील तरुणी बकरीचे पिलू शोधण्यासाठी घरापासून लांब अंतरावर गेली असता खाल्या जोब्या पाडवी याने ही संधी साधत त्याच्य शेत शिवारात तरुणीचा विनयभंग केला. तरुणीने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असता तिचे तोंड दाबून जबरी करण्याचा प्रयत्न केला. परिणामी तरुणीला जखमा झाल्या. त्याच्या तावडीतून सुटून ती गावात आली. घडलेली घटना मैत्रीणीला सांगितले. मैत्रीणीने घरच्या लोकांना सांगितल्यावर धडगाव पोलिसात फिर्याद देण्याचे ठरले. तरुणीच्या फिर्यादीवरून सुभाष वेड्या पाडवी याच्याविरुद्ध विनयभंग व अत्याचाराचा प्रयत्न याअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपास अधिकारी पोलीस निरिक्षक एस.बी.भामरे यांनी तपास करून दोषारोपपत्र शहादा न्यायालयात दाखल केले होते. अतिरिक्त सत्र न्यायाधिश पी.बी.नायकवाड यांच्या न्यायालयात हा खटला चालला.
सर्व साक्षी पुरावे लक्षात घेत न्या.नायकवाड यांनी आरोपी सुभाष पाडवी याला विनयभंगान्वये पाच वर्ष कारावास व पाच हजार दंड, कलम ३७६ अन्वये सात वर्ष सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
सरकार पक्षातर्फे अॅड.स्वर्णसिंह गिरासे यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून हवालदार पुरुषोत्तम सोनार होते.