मोलगीत रस्ता रोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 11:51 IST2019-02-27T11:51:30+5:302019-02-27T11:51:53+5:30
अतिदुर्गम भाग : समस्या सुटत नसल्याने नागरिक त्रस्त, प्रशासनाचे दुर्लक्ष

मोलगीत रस्ता रोको आंदोलन
मोलगी : सातपुड्यातील दुर्गम भागात जनतेला भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी व प्रशासनाचे या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मोलगी येथील बिरसा मुंडा चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
मोलगी व परिसरात रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून वीजपुरवठा वारंवार खंडित असून वीज जोडणी नसतानाही बिले देण्यात येत आहे. ज्यांच्याकडे मीटर आहे त्यांना मीटर रिडींग न घेता अंदाजे अवास्तव वीज बिल दिले जातात. दूरसंचार विभागानेही दुर्लक्ष केले असून मोबाईल टॉवर फक्त नावालाच उभे आहे. रोजगार निर्मिती नसल्याने मजुरांनी स्थलांतर केल्याने गावे ओस पडली आहेत. परिसरात केवळ एकच राष्टÑीयकृत बँक असून तेथील अधिकारी व कर्मचारी मनमानी करतात. बँकेच्या व्यवहारासाठी संपूर्ण दिवस वाया जातो. पशुधन विभाग कार्यालयाला नेहमी कुलूप असते. सार्वजनिक बांधकाम विभागानेही रस्त्यांकडे दुर्लक्ष केले आहे. मोलगी गावातील वाहतूक व्यवस्था बेशिस्त झाली असून नागरिक कंटाळले आहेत. या सर्व समस्यांमुळे सामान्य जनता त्रस्त झाली असून त्या सोडविण्यासाठी व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोलगी व परिसरातील जनतेने एकत्र येऊन येथील बिरसा मुंडा चौकात रस्ता रोको आंदोलन केले. वरील मागण्या व समस्या त्वरित न सोडविल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा नागरिकांनी दिला. आंदोलनप्रसंगी पोलीस, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, कृषी, वीज वितरण, दूरसंचार, महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आंदोलनात जि.प.चे माजी सभापती सी.के. पाडवी, अॅड.कैलास वसावे, अॅड.सरदार वसावे, जि.प. सदस्य सीताराम राऊत, पं.स. सभापती बिजा वसावे, उपसभापती भाऊ राणा, वाण्या वळवी, गुमानसिंग वसावे, सागर पडवी, अनिल वसावे, वसुंधरा वसावे, बाजीराव पाडवी, डॉ.दिलवरसिंग वसावे, धीरसिंग वसावे, ईश्वर वळवी, दमन्या पाडवी, रायसिंग वसावे यांच्यासह शेकडो युवक सहभागी झाले होते. पोलीस निरीक्षक पंडितराव सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता.