मोकाट कुत्र्यांना चर्मरोगाची लागण झाल्याने पसरते दुर्गंधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 12:10 IST2021-01-09T12:09:41+5:302021-01-09T12:10:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : मागील काही दिवसांपासून शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरीसह परिसरातील मोकाट कुत्र्यांना चर्मरोगाची लागण झाली आहे. खरुजसदृश ...

Mokat dogs get skin disease and the stench spreads | मोकाट कुत्र्यांना चर्मरोगाची लागण झाल्याने पसरते दुर्गंधी

मोकाट कुत्र्यांना चर्मरोगाची लागण झाल्याने पसरते दुर्गंधी

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राह्मणपुरी : मागील काही दिवसांपासून शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरीसह परिसरातील मोकाट कुत्र्यांना चर्मरोगाची लागण झाली आहे. खरुजसदृश जखमांनी माखलेले मोकाट कुत्रे गावात सैरावैरा फिरत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. यापासून संसर्ग पसरण्याची भीती व्यक्त होत असून, नागरिकांच्या आरोग्याची चिंता वाढत आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष नसले तरीही कुंकवाचे पाणी बाटलीत भरुन घरासमोर ठेवल्याने कुत्रे फिरकत नसल्याच्या समजातून अनेक घरांसमोर अशा बाटल्या दिसू लागल्या आहेत. 
           ग्रामीण भागात अनेक दिवसांपासून हा प्रकार निदर्शनास येत आहे. गावातील मोकाट कुत्र्यांच्या अंगावरील केस गळती होऊन बहुतांश मोकाट कुत्र्यांच्या संपूर्ण अंगावर जखमा झाल्याचे आढळून येत आहे. जखमांनी माखलेले हे मोकाट कुत्रे गावामध्ये सैरभैर फिरत असताना अनेक नागरिकांच्या घरामध्येसुद्धा प्रवेश करतात.  कुत्र्यांच्या अंगावरील जखमांमधून रक्तस्राव होत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. चर्मरोगाची लागण झालेल्या कुत्र्यांपासून लहान मुलांना धोका निर्माण झाला आहे. कुत्र्यांच्या या संसर्गापासून परिसरातील मानवी आरोग्य धोक्यात येण्याची चिंता वाढली आहे. या बाबीकडे संबंधित प्रशासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष घालून या रोगी मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून या मोकाट कुत्र्यांचे प्रमाण खूपच वाढले आहे. या कुत्र्यांच्या त्रासापासून बचावासाठी महिला दारात प्लास्टिकच्या बाटलीत कुंकवाचे पाणी भरून ठेवत आहेत. गेल्या वर्षापासून ग्रामीण भागात कुत्र्यांसाठी हा नवा फंडा अवलंबला जात आहे. त्यामुळे बहुतांश घरासमोर लाल रंगाच्या बाटल्या ठेवल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ही बाटली पाहून कुत्रे फिरकत नसल्याचे महिलांचे म्हणणे आहे; परंतु या प्रकाराचा या मोकाट कुत्र्यांवर कोणताही परिणाम झाल्याचे सध्या तरी दिसून येत नाही.

मानवी आरोग्याला धोका होण्याची शक्यता
मागील काही दिवसात ब्राह्मणपुरी परिसरात या मोकाट कुत्र्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मोकाट कुत्र्यांच्या अंगावर आलेल्या या चर्मरोगाचा संसर्ग पसरुन मानवी आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे मोकाट कुत्र्यांचा संपर्क टाळावा, तसेच प्रत्येकाने घरात पाळीव कुत्रे असतील तर त्यांना अँटीरेबीज आणि इतर लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. यामुळे कुत्रे पिसाळण्याची व त्यांना इतर रोगाची लागण होण्याची शक्यता कमी असते.

Web Title: Mokat dogs get skin disease and the stench spreads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.