जलकुंभाच्या परिसरात मोकाट कुत्रे आणि काटेरी झाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2020 12:26 IST2020-11-15T12:26:34+5:302020-11-15T12:26:43+5:30
n लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्यातील अनेक शहरांमध्ये जलकुंभात डेंग्यूच्या डासाच्या अळ्या सापडणे, अस्वच्छता आणि गळतीमुळे साथीच्या ...

जलकुंभाच्या परिसरात मोकाट कुत्रे आणि काटेरी झाडे
n लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राज्यातील अनेक शहरांमध्ये जलकुंभात डेंग्यूच्या डासाच्या अळ्या सापडणे, अस्वच्छता आणि गळतीमुळे साथीच्या आजारांची लागण होणे असे प्रकार सुरू आहेत. नंदुरबार पालिकेमार्फत मात्र जलकुंभांच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष दिले जाते. त्यासाठी नियमित जलकुंभ स्वच्छ केले जात असल्याचा दावा पालिकेचा आहे. परंतु ‘लोकमत’ने केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये मात्र काही ठिकाणी घाणीचे साम्राज्य दिसून आले. त्याकडे पालिकेने लक्ष देणे आवश्यक आहे.
नंदुरबार शहराला विरचक प्रकल्प व आंबेबारा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. त्या ठिकाणाहून आलेल्या पाईपलाईनमधून साक्रीनाका, शांतीनगर व संजय नगर या मोठ्या जलकुंभात पाणी साठवण करून इतर १२ लहान जलकुंभात ते नेले जाते. त्या माध्यमातून शहरातील साधारणत: १६ हजारांपेक्षा अधिक नळजोडणीधारकांना आणि शासकीय कार्यालये, शासकीय रुग्णालय, शासकीय वसतिगृह यांना पाणीपुरवठा केला जातो. शहराची आगामी अर्थात २०४० पर्यंतच्या लोकसंख्येला अनुसरून पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली आहे.
अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे विविध आजारांची लागण मोठ्या प्रमाणावर होते. आजारांचे मूळ कारण अशुद्ध पाणी हेच आहे. ही बाब लक्षात घेता नंदुरबार पालिकेचे जलशुद्धीकरण प्रकल्प आणि सर्वच १५ जलकुंभ हे दर २० ते २५ दिवसात स्वच्छ केले जात असल्याचे पालिकेचे म्हणने आहे. रहिवासी वस्तीत असलेल्या जलकुंभांच्या परिसरात काही नागरिक अस्वच्छता करतात, तेथेच पाणी भरण्यासाठी येणे आणि कपडे धुणे असे प्रकार करतात. ते होऊ नये यासाठी शांतीनगर व संजयनगर जलकुंभ परिसरात उपाययोजना करण्यात आल्या आहेत. साक्रीनाका जलकुंभाच्या परिसरात आणखी उपाययोजना आवश्यक आहे. इतर जलकुंभ हे नवीन व उंचावर असल्याने तेथे कुणी जाऊ शकत नाही.
पावसाळ्यात पाईपलाईन लिकेज होणे, व्हाॅल्व्ह नादुरुस्त होणे असे प्रकार होत असल्यामुळे काही भागात अशुद्ध पाणीपुरवठा होतो. परंतु तो देखील वेळीच दुरुस्त करण्याचा प्रयत्न असतो. अस्वच्छता आणि अशुद्ध पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी आणखी आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असे पालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले.