कोरोना रुग्ण फिरतोय गावात मोकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 13:05 IST2020-08-30T13:05:03+5:302020-08-30T13:05:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : जिल्हाभरात कोरोना बाधित रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. परंतु शहादा ...

कोरोना रुग्ण फिरतोय गावात मोकाट
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राह्मणपुरी : जिल्हाभरात कोरोना बाधित रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. परंतु शहादा तालुक्यातील चांदसैली गावात कोरोना बाधित रुग्ण चक्क गावभर हिंडत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाचे ग्रामीण भागात दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी येथे कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने त्यांच्या संपर्कातीलचांदसैली गावातील पाच जण कोरोना बाधित आढळून आल्याने आरोग्य विभागाकडून २७ आॅगस्ट रोजी चार जणांना उपचारासाठी नेण्यात आले. परंतु त्यातील ३२ वर्षीय पुरुष हा उपचारासाठी जाण्यास नकार देत असल्याने रुग्णवाहिकेला परत जावे लागले होते. परंतु स्थानिक ग्रामसेवक, सरपंच यांच्या मध्यस्थीने पोलीस कर्मचाऱ्यांना बोलवून २८ आॅगस्ट रोजी सकाळी उपचारासाठी शहादा येथील कोविड केंद्रात नेण्यात आले. परंतु हा रुग्ण तेथे धिंगाणा घालत असल्याने त्याला आरोग्य विभागाकडून रुग्णवाहिकेत चांदसैली येथे होम क्वारंटाई करून गेले. परंतु हा रुग्ण घरी न थांबता गावभर हिंडत असल्याने संपूर्ण गावात रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या कोरोना बाधित रुग्णाला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समज देऊन उपचारासाठी घेऊन जावे. जेणेकरुन गावात रुग्ण संख्या वाढणार नाही, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष
चांदसैली गावातील नागरिक हे जवळील ब्राह्मणपुरी गावात बाजारहाटसाठी येतात. कोरोना बाधित रुग्णाला ताप, सर्दी, खोकला असूनही गावभर हिंडत असल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकाना जर त्याचा संसर्ग झाला तर मोठ्या प्रमाणावर रुग्ण संख्येत वाढ होण्याची भीती आहे. त्यात स्थानिक प्रशासनाबरोबर पोलीस प्रशासनही ग्रामीण भागात दुर्लक्ष करीत असल्याने रुग्ण संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.