मोड शिवारात बिबटे झाले उदंड अन् पशुपालकांना बसतोय भुर्दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 13:13 IST2020-08-24T13:13:43+5:302020-08-24T13:13:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : ग्रीन बेल्ट म्हणून परिचित असलेल्या तळोदा तालुक्यात आठ बिबट्यांचा संचार आहे़ यातील सहाच्या जवळपास ...

मोड शिवारात बिबटे झाले उदंड अन् पशुपालकांना बसतोय भुर्दंड
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरद : ग्रीन बेल्ट म्हणून परिचित असलेल्या तळोदा तालुक्यात आठ बिबट्यांचा संचार आहे़ यातील सहाच्या जवळपास बिबट हे मोड आणि बोरद शिवारात भटकत असून त्यांच्याकडून होणाऱ्या हल्ल्यांमुळे पशुपालक मेटाकुटीस आले आहेत़ वनविभागाकडून उपाययोजना करुनही बिबट्यांचा संचार कमी झालेला नाही़
सातपुड्यातील वनक्षेत्रात बिबट्यांचा रहिवास आहे़ परंतु तेथे अन्नसाखळी खंडीत झाली असल्याने अन्नाच्या शोधात बिबट्या बाहेर पडत आहे़ यातून बोरदपासून थेट आमलाडपर्यंत त्यांचा संचार सुरू झाला आहे़ पूर्वी केवळ उन्हाळी पिके आणि हिवाळ्यात ऊस वाढल्यानंतर बिबट्यांचा त्यात मुक्काम होत होता परंतु आता वर्षभर बिबटे याचा भागात फिरत असल्याचे चित्र दिसून येत आहे़ मोड ता़ तळोदा परिसरातील कळमसरे, आष्टे, करडे, गुंजाळी आणि मोहिदा या गावात दर दिवशी बिबट्या दिसून येत आहे़ रात्रीच्यावेळी हा हिंस्त्र प्राणी शेतशिवार सोडून गावात प्रवेश करत मोकाट कुत्रे आणि गायीच्या वासरांवर हल्ला करत फडशा पाडत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत़ गेल्या तीन महिन्यात किमान ६८ वेळा बिबट्याच्या पावलांचे ठसे वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिसून आल्याची माहिती देण्यात आली आहे़
प्रामुख्याने शेतशिवारात राहणारा बिबट्या निझरा नदी मार्गाने मोड किंवा आसपासच्या गावांपर्यंत पोहोचत असल्याचे दिसून आले आहे़ रस्त्याने वाहनांची वर्दळ असल्याने बिबट्या नदीचा मार्ग वापरत आहे़ सध्या गवत वाढले असल्याने दिवस गवतात लपून राहून रात्रीच्यावेळी गावशिवारातील गोठ्यांची चाचपणी करत एखाद्या गोठ्यात कमी उंचीचे वासरू किंवा गाय दिसल्यास त्याच्यावर हल्ला करत त्याचा फडशा पाडत आहे़ बहुतांश हल्ले हे रात्री तर कळमसरे शिवारात एका शेळीवर बिबट्याने सायंकाळी हल्ला करुन ठार केले होते़
मोहिदा, कळमसरे आणि मोड या तीन गावांच्या शिवारात चारच्या जवळपास बिबटे असल्याचा अंदाज वनविभागाचा आहे़ त्यांचा दैनंदिन आढावा घेण्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावून त्यांची पाहणी केली जात असल्याचे सांगण्यात आले़
तळोदा तालुक्यात वर्षभरात २२ शेळ्या, ९ मेंढ्या, २ घोडे आणि दोन व्यक्तींवर बिबट्याने हल्ला करुन त्यांना ठार केले आहे़ एकूण ४४ प्राण्यांचा बिबट्याने फडशा पाडल्याची नोंद आहे़ यात सर्वाधिक प्राणी हे बोरद आणि मोड पट्ट्यातील गावांमध्ये असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली आहे़ वनविभाग गेल्या तीन महिन्यात बोरद, मोड आणि मोहिदा शिवारात पिंजरे ठेवण्यात आले होते़ परंतु त्यात बिबट्या जेरबंद झालेला नाही़ या गावांमधील शेतशिवारात सातत्याने बिबट्या आणि त्याच्या पाऊल खुणा दिसून येतात़