आमदार राजेश पाडवी स्वतः पोहोचले कुरंगी गावात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:26 IST2021-04-05T04:26:57+5:302021-04-05T04:26:57+5:30
कोरोना आता गावोगावच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला असताना ग्रामीण भागातील नागरिक मात्र निष्काळजीपणाने वागताना दिसून येत आहेत. असेच चित्र शहादा ...

आमदार राजेश पाडवी स्वतः पोहोचले कुरंगी गावात
कोरोना आता गावोगावच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला असताना ग्रामीण भागातील नागरिक मात्र निष्काळजीपणाने वागताना दिसून येत आहेत. असेच चित्र शहादा तालुक्यातील कुरंगी येथे पहावयास मिळाले. गावात ६० ते ७० टक्के ग्रामस्थ आजारी असूनही आरोग्य विभागाला खबर नाही. कुरंगी येथील ग्रामस्थ सर्दी, खोकला, ताप व कोरोनाची लक्षणे असूनही कोरोना चाचणी न करता घरातच बसून घरगुती उपाय करीत आहेत. गावात आतापर्यंत उपचाराअभावी सात जणांचा मृत्यू झाला आहे. तरीही गावातील नागरिक कोरोना चाचणी करण्यासाठी जात नसल्याचे लक्षात आल्याने तेथील सरपंचांनी आमदार राजेश पाडवी यांना याबाबत माहिती दिली. आमदार पाडवी यांनी लागलीच तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र वळवी यांच्याशी संपर्क साधत उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
आमदार राजेश पाडवी हे उपविभागीय अधिकारी डॉ.चेतन गिरासे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र वळवी, गटविकास अधिकारी रघुवेंद्र घोरपडे आदींसह डॉक्टरांचे पथक घेऊन कुरंगी येथे दाखल झाले. आमदार पाडवी यांनी कुरंगी येथील नागरिकांना आपल्या भाषेत समजावून सांगितले व कोरोना चाचणी करण्याचे आवाहन केले. नागरिकांची मनातील कोरोना चाचणी करण्याविषयी भीती आमदार पाडवी व आरोग्य पथकाने काढली व कोरोना चाचणी करण्यास सांगितले.
या वेळी आमदार पाडवी यांनी जनतेला स्वस्थ रहा, सुरक्षित रहा व आरोग्याची काळजी घ्या आणि कोणत्याही गावात आरोग्याच्या समस्या असतील तर लागलीच मला संपर्क साधा, असे आवाहन केले. यावेळी जि.प.चे माजी सदस्य सुनील चव्हाण, डॉ.विजय चौधरी, डॉ.जितेंद्र साळुंखे, डॉ.निकम, योगेश पाटील, गोपाल पावरा, गोपी पावरा, सरपंच महेंद्र शेमळे, स्वीय सहायक हेमराज पवार आदी उपस्थित होते.