एफएमचे मृगजळ, कम्युनिटीचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 21:42 IST2020-12-13T21:42:40+5:302020-12-13T21:42:53+5:30
मनोज शेलार लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आकाशवाणीतर्फे सुरू करण्यात येणारे नंदुरबारातील एफ.एम.रेडिओ केंद्र बारगळले आहे. दोन ...

एफएमचे मृगजळ, कम्युनिटीचा मार्ग मोकळा
मनोज शेलार
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : आकाशवाणीतर्फे सुरू करण्यात येणारे नंदुरबारातील एफ.एम.रेडिओ केंद्र बारगळले आहे. दोन वर्षांपूर्वी फेज थ्रीच्या शहरांच्या यादीत नंदुरबारच्या एफ.एम.केंद्रासाठी निविदा काढण्यात आली होती. परंतु ती कुणीही भरली नव्हती. दुसरीकडे केंद्रीय माहिती व सुचना प्रसारण मंत्रालयाच्या विविध मंजुऱ्या मिळाल्यानंतर आता कृषी विज्ञान केंद्राचे कम्यूनिटी रेडिओ केंद्र सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे कृषी विषयक विविध माहितींचे व कार्यक्रमांचे या रेडिओ केंद्राद्वारे प्रसारण केले जाणार आहे.
नंदुरबारात एफ.एम.केंद्र सुरू करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. कारण धुळे केंद्रांची प्रेक्षपण क्षमता कमी असल्यामुळे त्याचा नंदुरबारला उपयोग होत नाही. दुसरीकडे बडोदा, सुरत, इंदोर केंद्रांची रेंज जिल्ह्यातील काही भागात मिळत असली तरी ती सुस्पष्ट राहत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील दऱ्या खोऱ्या ची परिस्थितीचा विचार करतांना स्वतंत्र एफ.एम.केंद्राची मागणी रास्त आहे. परंतु केंद्राची निविदा भरण्यासाठी कुणीही पुढे आले नसल्याने हे केंद्र बारगळले.
पहिले कन्युनिटी रेडिओ केंद्र
कृषी विज्ञान केंद्राने कम्युनिटी रेडिओ केंद्र सुरू करण्यासाठी तयारी दर्शविली होती. त्यानुसार या केंद्राला मान्यता मिळाली आहे. लवकरच हे केंद्र सुरू होणार आहे.
कृषी विज्ञान केंद्रात आधीच सर्व इन्फास्ट्रक्चर उपलब्ध आहे. त्यामुळे फारशी मेहनत घ्यावी लागली नाही. या केंद्राच्या माध्यमातून कार्यक्रमाचा, प्रेक्षपणाचा आणि कर्मचारींसह इतर खर्च पहिल्या तीन वर्षाकरीता केंद्र सरकार देणार आहे. त्यानंतर मात्र स्थानिक उत्पन्नाच्या माध्यमातून अर्थात जाहिरात आणि प्रायोजकांच्या माध्यमातून मिळणाऱ्या महसुलातून खर्च भागवावा लागणार आहे. या रेडिओ केंद्राची प्रेक्षपण क्षमता सुरुवातीला केवळ १५ किलोमिटर अंतराची राहणार आहे. त्यानंतर ती वाढविता येणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मिळणाऱ्या निधीतून येथील रेडिओ केंद्राला मंजुरी मिळाली आहे. जिल्हा नियोजन समितीने त्यासाठी ७६ लाख रुपयांची तरतूद केलेली आहे.
या केंद्रात पदनिर्मिती आणि भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे लवकरच या केंद्रातून कार्यक्रम प्रेक्षेपीत होणार आहेत.
एफ.एम. चे स्वप्न...
एफ.एम.रेडिओ केंद्र सुरू करण्यास मंजुरीसाठी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने हिरवा कंदील दिला होता. त्यासाठी नंदुरबारचा समावेश हा शहरांच्या वर्गवारीनुसार तिसऱ्या यादीत करण्यात आला होता. त्यानुसार दोन वर्षांपूर्वी देशपातळीवर नंदुरबारसह देशातील इतर शहरांच्या एफ.एम.केंद्रासाठी माहिती व सुचना प्रसारण मंत्रालयाने निविदाही प्रसिद्ध केली होती. परंतु नंदुरबारसह देशातील १७ शहरांच्या एफ.एम.केंद्रांसाठी कुणीही निविदा भरल्या नाहीत. त्याला कारण उत्पन्नाचे स्त्रोत नसल्याचे समोर आले.
नंदुरबारला खाजगी एफ.एम.रेडिओ केंद्र जरी सुरू झाले तरी त्यातून मिळणारा महसूल अगदीच अल्प राहणार आहे. त्यामुळे संबधित खाजगी कंपनीला ते परवडणार नाही. ही बाब गृहित धरूनच नंदुरबारच्या केंद्रासाठी कुणी फारशी उत्सूकता दाखविली नव्हती. त्यामुळे कम्युनिटी प्रमाणे शासकीय अनुदानावरच ते सुरू करता येऊ शकते.
दूरदर्शनचे नंदुरबार आणि शहादा ही दोन सहक्षेपण केंद्र ही डिजीटल ची प्रक्रिया सुरू आहे. या केंद्रांवरूनच आकाशवाणीचे इतर एफ.एम.रेडिओंचे सहसक्षेपण करता येऊ शकते. थेट मोबाईलवरही रेडिओ ट्रांन्झीस्टरसारखे एफ.एम.ऐकता येणार आहे.