देशभर कोरोनाचा हाहाकार अन् दुर्गम भागात आरोग्य केंद्र बंद ठेवण्याचा चमत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 12:40 IST2020-05-04T12:40:40+5:302020-05-04T12:40:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क धडगाव : जगभरात कोरोनाची साथ सुरु असताना दुर्गम भागात पुन्हा मात्र प्राथमिक आरोग्य केंद्र बंद ठेवली ...

The miracle of closing health centers in remote areas across the country | देशभर कोरोनाचा हाहाकार अन् दुर्गम भागात आरोग्य केंद्र बंद ठेवण्याचा चमत्कार

देशभर कोरोनाचा हाहाकार अन् दुर्गम भागात आरोग्य केंद्र बंद ठेवण्याचा चमत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
धडगाव : जगभरात कोरोनाची साथ सुरु असताना दुर्गम भागात पुन्हा मात्र प्राथमिक आरोग्य केंद्र बंद ठेवली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे़ राजबर्डी ता़ धडगाव येथील आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारीच हजेरी देत नसल्याने कोरोनाचे गांभिर्य केवळ कागदावर असल्याचे स्पष्ट झाले आहे़
सातपुड्याच्या दुर्गम भागातील राजबर्डी या तीन हजार लोकसंख्येच्या गावासह शेलकुवी, राजबर्डी, कामोद, कुकलट, सिंदवाणी सह लगतच्या पाड्यांच्या सोयीसाठी राजबर्डी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे़ गेल्या एक वर्षांपासून येथे वैद्यकीय अधिकारी नियमित येत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे़ नियुक्तीस असलेले इतर सर्व कर्मचारी येथे हजर असतात परंतू वैद्यकीय अधिकारी मात्र दिसून येत नाहीत़ अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी कुणी गेल्यास योग्य ती उत्तरे दिली जात नाहीत़ तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येची गावे असल्याने राजबर्डी येथील आरोग्य केंद्र आदिवासी बांधवांसाठी सर्वाधिक सोयीचे आहे़ १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या धडगाव येथे जाण्यापेक्षा या केंद्रातच उपचार करणे योग्य मानले जाते़ धडगाव ग्रामीण रुग्णालय तसेच इतर ठिकाणी वैद्यकीय अधिकारी वेळेवर हजर होत असताना राजबर्डी येथेच अधिकारी येत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे़
याबाबत आरोग्य विभागाकडे नागरिकांनी तक्रारी करुनही कारवाई करण्यात आलेली नाही़ काही कर्मचारी निवासी असल्याने वेळ मारुन नेली जात आहे़ परंतू वैद्यकीय अधिकारी हे निवासी नसल्याने अडचणी वाढत आहेत़ दरम्यान याबाबत आरोग्य विभागासोबत संपर्क केला असता, तो होवू शकलेला नाही़ कोरोनामुळे क्वारंटाईन कक्षात राजबर्डीचे वैद्यकीय अधिकारी असावेत असे सांगण्यात येत होते़ परंतू तालुक्यातील मांडवी येथे कक्षात ग्रामीण रुग्णालय आणि तालुका वैद्यकीय अधिकारी यांचे पथक कार्यरत आहे़ त्यात संबधित अधिकाºयाचा समावेश नाही़
दुसरीकडे राजबर्डी आरोग्य केंद्रात येथे नियुक्ती देण्यात आलेल्या वैद्यकीय अधिकारी यांच्यावर जिल्हा रुग्णालयातील क्षयरोग तपासणी केंद्र आणि कुष्ठरोग कार्यालय यांचा भार देण्यात आला आहे़ यातून वर्षभरापासून त्यांनी येथे पायच ठेवला नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे़ यामुळे कारवाईची मागणी होत आहे़

राजबर्डी हे गाव उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या स्मार्ट व्हिलेज योजनेत समाविष्ट गाव आहे़ त्याच ठिकाणी प्राथमिक आरोग्य सातत्याने बंद राहत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे़ रविवारीही केंद्र सुरु करण्याचे आदेश असताना केंद्राला टाळे लावल्याचे प्रकार सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे़

Web Title: The miracle of closing health centers in remote areas across the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.