पोषण सुधारण्यासाठी शाळांमध्ये आता बाजरी, ज्वारी व नाचणीचे चॉकलेट वाटणार

By मनोज शेलार | Published: March 17, 2024 04:51 PM2024-03-17T16:51:43+5:302024-03-17T16:52:05+5:30

जिल्ह्यातील पात्र शाळांची संख्या आणि इतर संबंधित माहिती जिल्ह्यांमधून आधीच गोळा करण्यात आली होती.

Millet, Jowar and Nachani chocolates will now be distributed in schools to improve nutrition | पोषण सुधारण्यासाठी शाळांमध्ये आता बाजरी, ज्वारी व नाचणीचे चॉकलेट वाटणार

पोषण सुधारण्यासाठी शाळांमध्ये आता बाजरी, ज्वारी व नाचणीचे चॉकलेट वाटणार

नंदुरबार : विद्यार्थ्यांचे पोषण सुधारण्यासाठी जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रातील शाळांमध्ये आता बाजरी, ज्वारी व नाचणीचे चॉकलेट वितरित केले जात आहेत. राज्यातील पाच जिल्ह्यांत हा उपक्रम राबविला जात असून त्यात खान्देशातील तिन्ही जिल्ह्यांचा समावेश आहे.

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतील नावीन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. राज्यातील जळगाव, उस्मानाबाद, नांदेड, नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील पात्र शाळांमधील आदिवासी आणि आकांक्षित क्षेत्रात पोषक तत्त्वांचा पुरवठा करण्याकरिता त्यांचे वाटप केले जात आहे. त्याअंतर्गत या उपक्रमात नाचणीसह चॉकलेट पौष्टिक बार, ज्वारीसह मिश्र फळ बाजरी पौष्टिक बार आणि  पीनट  बटर बाजरी पौष्टिक बार बाजरी असे तीन प्रकारचे चॉकलेट वाटप करण्यात येत आहेत. त्यासाठी वरील जिल्ह्यातील पात्र शाळांची संख्या आणि इतर संबंधित माहिती जिल्ह्यांमधून आधीच गोळा करण्यात आली होती.

चॉकलेट मिलेट न्यूट्रेटिव्ह बार विथ रागी(नाचणी) इयत्ता पहिली ते पाचवी ३० ग्रॅम याप्रमाणे ८ दिवस. तर इयत्ता सहावी ते सातवी  ३०  ग्रॅमप्रमाणे ८ दिवस याप्रमाणे वाटप करावयाचे आहे. त्यानंतर मिक्स फ्रूट मिलेट न्यूट्रेटिव्ह बार विथ जवार(ज्वारी) इयत्ता पहिली ते पाचवी  ३० ग्रॅम ९ दिवसांसाठी, तर इयत्ता सातवी ते आठवी ३० ग्रॅम ९ दिवस याप्रमाणे वाटप करावयाचे आहे; तसेच पीनट बटर मिलेट न्यूट्रेटिव्ह बार विथ बाजरा इयत्ता पहिली ते पाचवी ३० ग्रॅम ८ दिवस, तर इयत्ता सहावी ते आठवी ३० ग्रॅम ८ दिवस याप्रमाणे वाटप करावयाचे आहे, असे शाळेतील मुख्याध्यापकांना कळविण्यात आलेले आहे.

त्याअनुषंगाने शाळेत स्तरावर या बारचे विद्यार्थ्यांना वाटप सुरू झाले आहे. रोज चॉकलेट बार, तसेच विविध धान्यांचे बार विद्यार्थ्यांना मिळत असल्यामुळे विद्यार्थीही आनंदित झाले आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना पोषण आहारासोबत पोषक तत्त्वे दिली जात असल्याने पालकांमध्येही समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे

Web Title: Millet, Jowar and Nachani chocolates will now be distributed in schools to improve nutrition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.