भाजपतर्फे ठिकठिकाणी दूध आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 12:36 IST2020-08-02T12:36:09+5:302020-08-02T12:36:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गायीच्या दूधाला सरसकट १० रुपये प्रती लिटर अनुदान मिळावे व दुधाच्या पावडरला प्रती किलो ...

Milk agitation by BJP in various places | भाजपतर्फे ठिकठिकाणी दूध आंदोलन

भाजपतर्फे ठिकठिकाणी दूध आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गायीच्या दूधाला सरसकट १० रुपये प्रती लिटर अनुदान मिळावे व दुधाच्या पावडरला प्रती किलो ५० रुपये अनुदान देण्याची मागणी करुनदेखील शासनाने दूध उत्पादक शेतकऱ्यांची मागणी मान्य न केल्याने शनिवारी भाजपने जिल्हाभर आंदोलन केले. नंदुरबारात भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांना आंदोलन करण्यापुर्वीच पोलिसांनी ताब्यात घेतले.
यावेळी विरोध झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. अक्कलकुवा येथे खासदार डॉ.हिना गावीत, शहाद्यात सातुपडा कारखान्याचे चेअरमन दिपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले.
दुधाच्या अनुदानासंदर्भात आंदोलन करण्यात येणार असल्याने नंदुरबार येथील भाजपाच्या जिल्हा कार्यालयाजवळ पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते याठिकाणी आंदोलनासाठी एकत्र आले होते. परंतू आंदोलन करण्यापुर्वीच पोलीसांनी चौधरी यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्तत केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्याशी भाजपा कार्यालयात चर्चा करुन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, चौधरी यांनी आम्ही सनदशिर मार्गाने आंदोलन करत आहोत. शासनाच्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन न करता सोशल डिस्टन्सींगचे पालन करुन आंदोलन करणार आहोत, असे सांगितले. परंतू पोलीस प्रशासनाने काहीही न ऐकता चौधरी यांना ताब्यात घेतले. त्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले होते. यावेळी पोलीस प्रशासनासह शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी राजेंद्रकुमार गावित, निलेश माळी, सदानंद रघुवंशी, पंकज पाठक, कमल ठाकूर, सविता जायस्वाल, संगिता सोनवणे आदी उपस्थित होते.
दरम्यान, वाघेश्वरी चौफुलीवर आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला होता.
शहाद्यात रास्तारोको
तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहरातील डोंगराव रस्ता बायपास ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करून सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. यावेळी सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष नगरसेवक प्राचार्य मकरंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन सुनील पाटील, जिल्हा उपाध्यक्षा कल्पना पंड्या, शहराध्यक्ष विनोद जैन, जितेंद्र जगदाळे, जयेश देसाई यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

अक्कलकुवा येथे भाजपतर्फे दूध वाटप करून आंदोलन करण्यात आले. खासदार डॉ.हिना गावीत यांनी सहभाग घेतला. त्यांच्या हस्ते दूध वाटप करण्यात आले. त्यानंतर तहसीलदार म्हस्के यांना निवेदन देण्यात आले. भाजप तालुकाध्यक्ष विनोद कामे, अक्कलकुवा शहराध्यक्ष निलेश पाडवी, माजी जिल्हाउपाध्यक्ष विश्वास मराठे व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Milk agitation by BJP in various places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.