मुले पकडण्याच्या संशयावरून पंढरपुरातील तिघांना म्हसावदला चोपले, गाडीही जाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 13:11 IST2018-06-29T13:11:05+5:302018-06-29T13:11:21+5:30

मुले पकडण्याच्या संशयावरून पंढरपुरातील तिघांना म्हसावदला चोपले, गाडीही जाळली
लोकमत न्यूज नेटवर्क
म्हसावद : शहादा तालुक्यातील म्हसावद येथे मुले पकडणारी टोळी असल्याच्या संशयावरून प्रवासी वाहन पेटवल्याची घटना गुरुवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली़ याप्रकरणी पोलीसांनी सोलापूर येथील तिघांना संशयावरून ताब्यात घेतल़े
गुरूवारी रात्री म्हसावद-राणीपूर रोडवर एमएच 13-बीएन 7971 हे चारचाकी वाहन फिरत असल्याचे काहींना दिसून आल़े नागरिकांनी त्यांची विचारपूस केली़ परंतू त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने जमाव गोळा झाला़ यावेळी जमावातील काहींनी थेट वाहनाला आग लावली़ या प्रकारानंतर म्हसावद पोलीसांनी तिघांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणल़े त्यात नंदकुमार बाळासाहेब दोबे, रा.पंढरपुर, रामा विठ्ठल शिंदे, रा.भटूकरा, ता.पंढरपूर व सचिन गुरलिंग कवटे रा.पंढरपूर यांचा समावेश आहे. यापैकी दोघे नगरसेवक असल्याचे सांगण्यात आले. दोघा गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सदरची गाडी व संशयित सोलापूर असल्याचे समजत़े घटनेनंतर मोठा जमाव पोलीस ठाण्यासमोर गोळा झाल्याने पोलीस मुख्यालय, शहादा व सारंगखेडा पोलीस ठाण्यातून अतिरिक्त कुमक मागविण्यात आली. अश्रूधुराच्या नळकांडय़ा फोडल्यानंतर जमावावर नियंत्रण मिळविता आले.याप्रकरणी जमावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.