मामाच्या मोहिदा येथे शांतता कमिटीची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:21 IST2021-06-17T04:21:31+5:302021-06-17T04:21:31+5:30
दरम्यान, १५ जून रोजी सायंकाळी पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांची एकत्र बैठक घेऊन गावात शांततेचे आवाहन ...

मामाच्या मोहिदा येथे शांतता कमिटीची बैठक
दरम्यान, १५ जून रोजी सायंकाळी पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांची एकत्र बैठक घेऊन गावात शांततेचे आवाहन केले. सोमवारी रात्री अचानक घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने मंगळवारी सायंकाळी गावात दोन्ही समाजाच्या लोकांच्या सहकार्याने शांतता कमिटीची बैठक बोलावण्यात आलेली होती. या शांतता कमिटीला सामाजिक कार्यकर्ते भाऊभाई पाटील, पुरुषोत्तम शंभू पाटील, माजी सरपंच गिरीधर लिंमजी पाटील, माजी सरपंच जाधव संभू पाटील, राजाराम पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड, परबत भिल, सुकराम भिलसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत म्हणाले, गावातील प्रत्येक नागरिकांना एकमेकांशी संबंध ठेवायचे असतात. रोज येणे-जाणे-भेटणे क्रमप्राप्त आहे. आपसातील मतभेद विसरून गावात शांतता ठेवा व शेतीकामे सुरू करून एकमेकांना सहकार्य करा आणि कोणत्याही अफवांना बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी केले. याव्यतिरिक्त पोलीस उपनिरीक्षक नीलेश वाघ यांनी गावातील दोन्ही समाजातील व्यक्तींना शांततेचे आवाहन करीत, गाव शांततेकरिता आपण सर्वांनी प्रयत्न करावेत. रोजच्या शेती, व्यवसायासोबत दिनचर्या आनंदाने सुरू ठेवा. गावात असलेल्या शांततेला गालबोट लागणार नाही यासाठी प्रत्येकाने सहकार्य करण्याचे आवाहनदेखील केले. कोणीही अफवांना बळी पडू नये, अफवा पसरणार नाहीत याकडे लक्ष द्यावे. अफवा पसरविणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येईल. सामाजिक कार्यकर्ते भाऊभाई पाटील यांनीदेखील मार्गदर्शन करताना म्हटले की, मामाच्या मोहिदा हे गाव तालुक्यात सामाजिक सांस्कृतिक सलोख्याचे व शांतताप्रिय गाव आहे. या गावात सर्व समाज एकमेकांच्या सहकार्याने गुण्यागोविंदाने वावरत असतात. घडलेल्या घटनेला कोणी तरी खत-पाणी घातले असेल. असे असले तरी गावातील समस्या या गावातील नागरिकांनी बसूनच सोडवल्या पाहिजेत. कुठल्याही अफवांना नागरिकांनी बळी पडू नये. गावातील तंटे गावातच शांततेने सोडवण्यात येणार असल्याचेदेखील सामाजिक कार्यकर्ते भाऊभाई पाटील यांनी सांगितले.
गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वच समाजातील घटकांकडून गावात प्रयत्न केला जाणार आहे. कोणीही अफवांना बळी पडू नये असे आवाहन देखील सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांनी केले आहे.
दोन समाज एकमेकांना सहकार्य करून गावात शांतता ठेवत असतात. कालच्या झालेल्या घटनेनंतर ग्रामस्थांनी दाखवलेली सहनशीलता व गावात शांतता प्रस्थापित केल्याने ग्रामस्थांचे पोलीस अधिकाऱ्यांनी कौतुक केले.
शहादा पोलिसात अंबालाल पाटील यांच्या फिर्यादीवरून दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे. अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नीलेश वाघ करीत आहेत.