डायरेक्ट व्हॉलिबॉल राष्ट्रीय स्पर्धेसाठी नंदुरबार येथे बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:58 IST2021-03-04T04:58:51+5:302021-03-04T04:58:51+5:30
नंदुरबार जिल्हा डायरेक्ट व्हॉलिबॉल असोसिएशनच्या विद्यमाने १३ व १४ मार्च रोजी नंदुरबार येथील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर डायरेक्ट व्हॉलिबॉलच्या ...

डायरेक्ट व्हॉलिबॉल राष्ट्रीय स्पर्धेसाठी नंदुरबार येथे बैठक
नंदुरबार जिल्हा डायरेक्ट व्हॉलिबॉल असोसिएशनच्या विद्यमाने १३ व १४ मार्च रोजी नंदुरबार येथील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर डायरेक्ट व्हॉलिबॉलच्या राष्ट्रीय स्पर्धां होत आहेत. या स्पर्धांसंदर्भातील नियोजनासाठी बैठक येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नंदुरबार जिल्हा डायरेक्ट व्हॉलिबॉल असोसिएशनच्या अध्यक्षा खासदार डॉ. हीना गावित होत्या. या वेळी कार्याध्यक्ष व मुख्य स्पर्धा नियंत्रक योगेंद्र दोरकर, उपाध्यक्ष नुह नुराणी, उपाध्यक्ष श्याम मराठे, सचिव प्रा. डॉ. ईश्वर धामणे, कोषाध्यक्ष बळवंत निकुंभ, सदस्य गिरीश परदेशी, प्रा. निशिकांत शिंपी, प्रा. डॉ. दुर्योधन राठोड, प्रवीण पाटील, अमोल भारती, प्रा. तारकदास, सीमा सोनगरे, प्राचार्य विनोद पाटील यांच्यासह क्रीडा शिक्षक, क्रीडाप्रेमी उपस्थित होते. बैठकीत नंदुरबार शहरात आयोजित केलेल्या दोन दिवसीय डायरेक्ट व्हॉलिबॉलच्या राष्ट्रीय स्पर्धांच्या आयोजनावर चर्चा करण्यात आली. तसेच या स्पर्धांसाठी विविध समित्या गठित करण्यात आल्या.
यावेळी खासदार डॉ.हीना गावित म्हणाल्या की, नंदुरबार येथे पहिल्यांदाच डायरेक्ट व्हॉलिबॉल राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. या स्पर्धांमध्ये सहभागी देशभरातील खेळाडू, प्रशिक्षक येत असल्याने नंदुरबारात होत असलेल्या राष्ट्रीयस्तरावरील स्पर्धांचे नियोजन यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने आयोजनात सहभाग द्यावा. योग्य नियोजन व समन्वय असल्यास स्पर्धा नक्कीच यशस्वी होतील. सर्व नियम पाळून स्पर्धांचे आयोजन होणार आहे. त्यासाठी प्रत्येक क्रीडा शिक्षकांचा सहभाग असणे आवश्यक आहे. व्हॉलिबॉलच्या राष्ट्रीय स्पर्धांच्या यशस्वी नियोजनाने नंदुरबाराचे नाव देशभरात जाईल. यासाठी स्पर्धांच्या आयोजनात सर्वांनी मोलाचा सहभाग द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
असोसिएशनचे कार्याध्यक्ष व मुख्य स्पर्धा नियंत्रक योगेंद्र दोरकर यांनी प्रास्ताविकातून स्पर्धेच्या नियोजनाची माहिती देऊन गठित केलेल्या समितींचे वाचन केले. तसेच प्रत्येक समितीच्या सदस्यांनी समन्वयातून स्पर्धेच्या आयोजनात एकदिलाने सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.