महायुतीच्या बैठकीत रुसवे-फुगवे झाले दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 15:52 IST2019-04-08T15:52:13+5:302019-04-08T15:52:49+5:30
पक्ष हितासाठी एकत्रीत काम करणार

महायुतीच्या बैठकीत रुसवे-फुगवे झाले दूर
नंदुरबार : भाजप महायुतीतील सर्व घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची एकत्रीत बैठक रविवारी आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांच्या निवासस्थानी घेण्यात आली. पक्षासाठी एकदिलाने काम करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. दरम्यान, सोमवार, ८ रोजी शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचे महायुतीतर्फे सांगण्यात आले.
महायुतीच्या घटक पक्षांमधील आणि पक्षातीलच काही पदाधिकाऱ्यांची नाराजीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती. या पार्श्वभुमीवर रविवारी आमदार डॉ.विजयकुमार गावीत, खासदार डॉ.हिना गावीत यांनी त्यांच्या निवासस्थानी स्वपक्षातील पदाधिकारी आणि युतीतील घटक पक्षातील प्रमुखांना चर्चेसाठी बोलविले होते. यावेळी काही पदाधिकारी व आणि नेत्यांनी नाराजीचा सूर लावला. परंतु त्यांची नाराजी दूर करण्यात आमदार गावीत व खासदार हिना गावीत यांना यश आले. अखेर पक्षहित लक्षात घेवून निवडणुकीत एकत्रीत काम करण्याचे ठरविण्यात आले. यावेळी जि.प.सदस्य अभिजीत पाटील, डॉ.रवींद्र चौधरी, सेनेचे पंडित माळी, मोहन खानवाणी, सुभाष पानपाटील आदी उपस्थित होते.
महायुतीच्या उमेदवार डॉ.हिना गावीत या सोमवार, ८ एप्रिल रोजी कार्यकर्त्यांसह रॅलीद्वारे उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.