बर्ड फ्लूबाबत शहादा परिसरातही उपाययोजना कराव्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:27 IST2021-02-08T04:27:59+5:302021-02-08T04:27:59+5:30
बर्ड फ्लूचा प्रसार होऊ नये म्हणून नवापूर येथील पोल्ट्री फार्ममधील सुमारे नऊ लाख पक्षी शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याची प्रक्रिया ...

बर्ड फ्लूबाबत शहादा परिसरातही उपाययोजना कराव्या
बर्ड फ्लूचा प्रसार होऊ नये म्हणून नवापूर येथील पोल्ट्री फार्ममधील सुमारे नऊ लाख पक्षी शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रशासनाने सुमारे १० किलोमीटर परिघाचा परिसर निगराणी क्षेत्र घोषित केला असून एक किलोमीटर परिसर बाधित म्हणून जाहीर केला आहे. पक्षी, अंडी, पशुखाद्य, विष्ठा वाहतुकीवर निर्बंध घालण्यात येऊन परिसर सील करून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बर्ड फ्लूचा संसर्ग व प्रसार होऊ नये यासाठी काळजी घेतली जात आहे. मात्र अद्यापही शहादा शहरासह परिसरात पोल्ट्री व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरूच आहे. नवापूर येथील अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पोल्ट्री व्यावसायिकांनी दक्षता घेणे आवश्यक झाले आहे. यामुळे मानवी प्रकृतीवर होणारा परिणाम लक्षात घेता सर्वसामान्य नागरिकांतही भीतीचे वातावरण पसरले आहे. शहर व परिसरातील सुरू असलेल्या पोल्ट्री व्यवसायामुळे बर्ड फ्लूची लागण होण्याची संभाव्यता लक्षात घेता प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवाई करणे अपेक्षित आहे. शहादा शहर व परिसरातील पोल्ट्रीतील पक्ष्यांचे नमुने तपासणीसह अंडी व पक्षीविक्रीवर निर्बंध आणण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. नवापूर येथील अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर शहादा तहसील प्रशासन व पशुसंवर्धन विभागाने उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे, अशी अपेक्षा जनतेकडून व्यक्त केली जात आहे.