गर्दी नियंत्रणासाठी शहाद्यात उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 10:25 IST2020-05-14T10:24:51+5:302020-05-14T10:25:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : जीवनावश्यक वस्तू वगळता इतर व्यावसायिक प्रतिष्ठाने सुरू असल्याने शहरात गर्दीचेप्रमाण वाढले होते. बुधवारी पालिकेच्या ...

Martyrdom measures for crowd control | गर्दी नियंत्रणासाठी शहाद्यात उपाययोजना

गर्दी नियंत्रणासाठी शहाद्यात उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : जीवनावश्यक वस्तू वगळता इतर व्यावसायिक प्रतिष्ठाने सुरू असल्याने शहरात गर्दीचेप्रमाण वाढले होते. बुधवारी पालिकेच्या पथकाने अनावश्यक दुकान उघडे ठेवून व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांना पालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन केल्यानंतर व्यवसायिकांनी यास प्रतिसाद देत आपापले व्यवसाय बंद ठेवले.
१७ मे पर्यंत लॉकडाऊन असल्याने व्यावसायिकांनी अनावश्यक दुकाने उघडू नये अन्यथा पालिकेतर्फे कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी दिला आहे. २१ एप्रिलला शहरात कोरोना विषाणू बाधित रूग्ण सापडल्यानंतर प्रशासनाने शहरात कंटेनमेंट व बफर झोनची निर्मिती करून अत्यावश्यक सेवेचे दुकाने उघडण्यास परवानगी दिली होती. नऊ पैकी एक बाधित रूग्ण मयत झाला असून, दोन बाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर सहा रूग्ण उपचार घेत आहे. अशा परिस्थितीत २५ एप्रिल नंतर शहरात नवीन बाधित रूग्ण आढळून आला नसल्याने गेल्या काही दिवसापासून प्रशासनाने अत्यावश्यक सेवांसह इतर व्यवसायिक प्रतिष्ठान उघडी ठेवून व्यवसाय करण्यास मुभा दिली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून याचा दुष्परिणाम प्रशासनाला दिसायला लागला.
शहरात गर्दीचे प्रचंड प्रमाण वाढल्याने प्रशासन सुद्धा हतबल झाले होते. अखेर बुधवारी पालिकेच्या पथकामार्फत अनावश्यक दुकाने उघडी ठेवून अन्य व्यवसाय करणाऱ्यांवर धडक कारवाईला सुरूवात झाली. सर्वप्रथम पालिकेतर्फे व्यवसायिकांना विनंती करण्यात आल्यानंतर व्यावसायिकांनीही त्यास सकारात्मक प्रतिसाद देत आपली दुकाने बंद केल्याने पालिकेच्या पथकाने कुठलीही दंडात्मक कारवाई केलेली नाही. प्रशासनाच्यावतीने १७ मे पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आव्हान करण्यात आले आहे.
शहरातील भाजी मंडई परिसर पुरुषोत्तम मार्केट, युनियन बँक परिसर, मुख्य रस्ता, दोंडाईचा रोड आदी भागात कारवाई करण्यात आली. शहरात नागरिकांची गर्दी वाढू नये यासाठी मुख्य रस्त्यावर केवळ अत्यावश्यक वस्तुंची दुकाने सुरू ठेवण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे.
मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी स्वत: हातात पोलिसांची काठी घेऊन कारवाईला सुरूवात केल्याने सर्वच अचंबित झाले होते. पथकात स्वच्छता निरीक्षक राजू चव्हाण, अभियंता संदीप टेंभेकर, सचिन महाडीक, माधव गाजरे, चेतन गांगुर्डे यांचा समावेश होता. विनाकारण नागरिकांनी गर्दी करू नये आवशक्यता असली तरच घराच्या बाहेर पडावे, प्रत्येक नागरिकाने स्वयंशिस्त पाळली तर शहरात कोरोना विषाणूचे संकट कमी होईल व आपली वाटचाल ग्रीन झोनकडे सुरू होईल, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Web Title: Martyrdom measures for crowd control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.