सर्जा -राजाच्या साजाने बाजारपेठ सजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:05 IST2021-09-02T05:05:07+5:302021-09-02T05:05:07+5:30
बाजारात शेतकरी बांधव पोळा सणाकरिता लागणारे साहित्य खरेदी करताना व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांसाठी पोळा हा सण खूप ...

सर्जा -राजाच्या साजाने बाजारपेठ सजली
बाजारात शेतकरी बांधव पोळा सणाकरिता लागणारे साहित्य खरेदी करताना व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांसाठी पोळा हा सण खूप महत्त्वाचा आहे. कारण शेतकरी बैलाच्या भरोशावर काळ्या मातीत सेवा करतो. त्यामुळे त्याच्या घरात अन्नधान्य येते. बैलाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळ्याच्या आदल्या दिवशी खांदेमळणी केली जाते. दुसऱ्या दिवशी पोळा हा सण मोठ्या उत्साहाने पार पडतो. पोळा सणासाठी शेतकरी पैशांची जुळवाजुळव करून आवश्यक त्या साहित्याची खरेदी करतात. दरवर्षाच्या तुलनेत बैलांच्या साजाच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र लाडक्या सर्जा राजासमोर ही वाढ जास्त वाटत नसल्याचे दिसून येत आहे.
गोधन घटले
गेल्या काही वर्षात ग्रामीण भागातील चराई क्षेत्रात झपाट्याने घट झाली. त्याचा परिणाम शेतक-यांच्या बांधावरील गोधनावर झाला आहे. गोधनाची संख्या घटल्याने चांगल्या प्रतीचे बैलदेखील शेतकऱ्यांकडे राहिले नाही. त्यातच बरेच शेतकरी आता तांत्रिक पद्धतीने ट्रॅक्टरद्वारे शेती करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या गोठ्यात बैल उरले नाही.