बाजारपेठची वेळ आता ७ ते ४
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 13:16 IST2020-08-04T13:15:57+5:302020-08-04T13:16:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील वाढती कोरोना बाधीतांची संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने नुकतेच आठ दिवस लॉकडाऊन केले. ...

बाजारपेठची वेळ आता ७ ते ४
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील वाढती कोरोना बाधीतांची संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने नुकतेच आठ दिवस लॉकडाऊन केले. आता मंगळवार, ४ आॅगस्टपासून नंदुरबार, शहादा, तळोदा व नवापूर या शहरांमधील बाजारपेठेची वेळ ही सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंतची राहणार आहे. चार वाजेपासून कडकडीत बंद पाळला जाणार आहे. केवळ अत्यावश्यक सेवा या काळात सुरू राहणार आहेत.
जिल्ह्यातील विशेषतअ नंदुरबार, शहादा, तळोदा व नवापूर येथे कोरोना बाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या दोन दिवसात तर तब्बल १०० रुग्ण आढळले. शिवाय पाच जणांचा मृत्यू देखील झाला. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने काही गंभीर पाऊले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचअंतर्गत बाजारपेठा दुपारी चार वाजता बंद होणार आहेत.
वेळेची अंमलबजावणी
बाजारात सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. सकाळची गर्दी नियंत्रीत करण्यासाठी उपाययोजना असल्या तरी ग्रामिण भागातील नागरिकांना अत्यावश्यक खरेदीसाठी शहरी भागात यावेच लागते. त्यामुळे सकाळी नाही किमान सायंकाळची गर्दी सक्तीने कमी करण्यासाठी प्रशासनाने आता थेट बंदचा निर्णय घेतला आहे. सद्य स्थितीत सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत बाजारपेठा सुरू ठेवण्याचा निर्णय आहे. आता ही वेळ बदलून सकाळी सात ते दुपारी चार अशी राहणार आहे. त्याची अंमलबजावणी मंगळवार, ४ आॅगस्टपासून करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने या चारही शहरांमध्ये अधिकृत सुचना देखील काढली आहे.
साखळी तोडण्यासाठी प्रयत्न
गर्दीतून कोरोनाचा फैलाव होतो. त्यामुळे गर्दी कमी करून साखळी तोडण्यासाठी ही उपाययोजना करण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्याची अंमलबजावणी नंदुरबार, शहादा, नवापूर व तळोदा या चार पालिकांनी सक्तीने करावी असेही निर्देश देण्यात आले आहेत.
अत्यावश्यक सेवा सुरू
दुपारी चार वाजेनंतर बाजारपेठा बंद राहणार असल्या तरी औषधी दुकाने, दवाखाने, दूध विक्री आदी सेवा सुरू राहणार आहेत. शिवाय रात्रीची संचारबंदी कायम राहणार आहे. संचारबंदीच्या काळात पेट्रोलपंप देखील बंद राहणार आहेत.
४चार शहरांव्यतिरिक्त इतर भागात नेहमीच्या वेळेत बाजारपेठ सुरू राहणार आहे. त्यात कुठलाही बदल नाही.
४जिल्हाभरातील रात्रीची संचारबंदी देखील कायम राहणार आहे.
४ग्रामिण भागातील नागरिकांनी अत्यावश्यक काम असेल तरच शहरी भागात यावे अन्यथा येण्याचे टाळावे.