पतंगोत्सवासाठी बाजारपेठेत उलाढाल वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 12:49 IST2020-01-14T12:48:58+5:302020-01-14T12:49:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पतंगोत्सव अवघा आठवड्यावर येवून ठेपल्याने पतंगाची बाजारपेठ गजबजली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत भाव स्थिर ...

The market for kite festival is booming | पतंगोत्सवासाठी बाजारपेठेत उलाढाल वाढली

पतंगोत्सवासाठी बाजारपेठेत उलाढाल वाढली

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पतंगोत्सव अवघा आठवड्यावर येवून ठेपल्याने पतंगाची बाजारपेठ गजबजली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत भाव स्थिर आहेत, मात्र दोरा अर्थात मांजा महागला आहे. दुसरीकडे नायलॉन मांजाची क्रेझ असतांना वाढत्या तक्रारी लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने हा मांजा विक्रीवर थेट बंदी घातली आहे.
नंदुरबारात मकरसंक्रांतीला पतंगोत्सव साजरा केला जातो. त्याची तयारी महिनाभर आधीपासून केली जाते. सध्या बाजारात ठिकठिकाणी पतंगांची दुकाने थाटण्यात आली आहेत. दोरा अर्थात मांजा बनविण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. त्यातून हजारो रुपयांची उलाढाल होत आहे.
यंदा भाव स्थिर
पतंगांचे भाव यंदा स्थिर असल्याचे दिसून येत आहे. विविध आकार व प्रकारातील हे पतंग सध्या लक्ष वेधून घेत आहेत. अगदी पाच रुपयांपासून ते २०० रुपयांपर्यंत किंमतीचे पतंग सध्या उपलब्ध आहेत. यंदा काही नवीन प्रकार बाजारात उपलब्ध झाले आहेत. प्लॅस्टिकच्या पतंगांमध्ये झालर लावलेली पतंग १०० रुपये नग या प्रमाणे विक्री होत आहे. या पतंगांची साईज अडीच ते तीन फूट एवढी आहे.
साचेनुसार देखील पतंग देखील विक्री होत असतात. एका साच्यात २० ते २०० पतंग राहतात. यंदा पतंगांवर हम है हिंदूस्थानी, पबजी, हॅप्यू न्यू ईअर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छबी असलेले तसेच टीव्ही चॅनेलवरील सपना चौधरी, स्पायडरमॅन, रॉकेट, भारतमाता की जय, अपना टाईम आयेगा या पात्रांचे चित्र असलेले पतंगांना मागणी आहे. मॅटल मारबल झालर, त्रिवेणी गोंडारे, कार्टूनची पतंग, चिल पतंग यांना देखील मागणी आहे.
मांजाला मागणी
पतंग उडविण्यासाठी दोरा अर्थात मांजाला देखील मोठी मागणी आहे. ५०० ते पाच हजार मिटर दोरा घेवून त्याचा मांजा बनविण्यात येतो. साधारणत: दीडशे ते एक हजार रुपये किंमतीचा हा दोरा असतो. दोरा गुंडाळण्यासाठी चक्रीची किंमत २० ते १०० रुपये इतकी असते. दोरा अर्थात मांजा सुरत येथून आणला जातो. घासलेला राहत असल्यामुळे त्याच्यापासून बोटाला ईजा होत नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
मांजा बनविण्याची पद्धत
नंदुरबारात मांजा बनविण्याची वेगळी पद्धत आहे. लाख, काचेचा चूरा, रंग यांचा वापर करून मांजा तयार केला जातो. एक हजार वार दोरा तयार करण्यासाठी ७० ते ३०० रुपये, अडीच हजार वार १६० ते ६०० रुपये तर पाच हजार वार चे दर ३५० ते हजार रुपये प्रमाणे आहेत.

पारंपारिक पद्धतीने मांजा बनविण्यासाठी देखील कारागिरांकडे गर्दी होत आहे. चार ते पाच तास अशा ठिकाणी नंबर लागत नसल्याची स्थिती आहे. शहरात मांजा बनविणारे ठराविक कारागिर आहेत. त्यांच्याकडे पहाटेपासूनच गर्दी होत आहे. दोराचे रिळ घेवून त्यांच्याकडे द्यावा लागतो. कारागिर लाख, काचेचा चुरा, रंग आदी एकत्र करून मांजा तयार करीत असतात. हा मांजा फारसा धोकेदायक राहत नाही.

Web Title: The market for kite festival is booming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.