Nandurbar Police : धडगाव पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस कर्मचाऱ्याच्या घरातच चक्क गांजा आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसाविरोधात गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला निलंबित करण्यात आले आहे. शशिकांत वसईकर असे पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून तो धडगाव पोलिस ठाण्यात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहे. पोलिस कर्मचारी असलेल्या वसईकर याने पोलिस कर्मचाऱ्याच्या घरातच गांजा साठवून ठेवल्याची खात्रीलायक माहिती पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस.यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथक पाठवून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पथकाने संबंधित पोलिस कर्मचाऱ्याच्या घरात धाड टाकून तपासणी केली असता सुमारे ९०० ग्रॅम गांजा आढळून आला आहे. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी शशिकांत वसईकर या पोलिस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पोलिस दलासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून तब्बल तीन दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या कारवाईची माहिती धडगाव पोलिस ठाण्याकडून दिली जात नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती. संबंधित कर्मचाऱ्याकडे गांजा आला कोठून किंवा कसा याचा तपास सध्या सुरू आहे. संबंधित कर्मचारी इतर कोणते अंमली पदार्थ किंवा गुटखा साठवून ठेवत होता, याची पडताळणी धडगाव पोलीसांसह जिल्हा पोलीस दलाकडून करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. साठा केलेल्या मालाची संबधित कर्मचारी विक्री करत होता किंवा कसे याचीही तपासणी सुरु आहे.
धडगाव तालुक्यातील भागात पोलिस विविध दलाकडून वेळोवेळी गांजा शेतीवर कारवाया झाल्या आहेत. यात पोलीस कर्मचाऱ्याकडेच गांजा आढळल्याने प्रकरणाचे गांभिर्य वाढले आहे. संबधित कर्मचाऱ्याला पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती धडगाव पोलीस ठाण्याने दिली आहे.