वेळेवर रेमडेसिविर न मिळाल्याने अनेकांचा मृत्यू : खासदार हिना गावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:31 IST2021-04-20T04:31:58+5:302021-04-20T04:31:58+5:30
नंदुरबार : रेमडेसिविर इंजेक्शन वेळेवर न मिळाल्याने ज्या रुग्णांचा मृत्यू झाला, त्याची जबाबदारी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी घ्यावी, ...

वेळेवर रेमडेसिविर न मिळाल्याने अनेकांचा मृत्यू : खासदार हिना गावित
नंदुरबार : रेमडेसिविर इंजेक्शन वेळेवर न मिळाल्याने ज्या रुग्णांचा मृत्यू झाला, त्याची जबाबदारी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी घ्यावी, असा प्रतिटोला खासदार डाॅ. हिना गावित यांनी पत्रकार परिषदेत लगावला.
माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रक काढून खासदार डाॅ. हिना गावित यांच्या तक्रारीमुळेच रेमडेसिविर इंजेक्शन वाटप बंद करावे लागल्याचा आरोप केला होता. त्यावर खासदार डाॅ. गावित यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन प्रतिआरोप केला. त्यांनी सांगितले की, रोटरी वेलनेस सेंटरच्या माध्यमातून रेमडेसिविर वाटप केले. लोकांनी रांगा लावल्या, त्यात त्यांचा वेळ वाया गेला, त्यामुळे अनेक रुग्णांना वेळेवर ते मिळाले नसल्याने त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले. जर चंद्रकांत रघुवंशी यांना ते वाटप करावयाचे होते, तर थेट रुग्णालयात का वाटप केले नाही, असेही त्यांनी सांगितले. सरकारी रेमडेसिविर इंजेक्शनचा रोटरी वेलनेस सेंटरने धंदा केला. त्याचा जाब विचारण्याचा आम्हाला अधिकार नाही का? असेही त्यांनी सांगितले.
आपण स्वत: दीड हजार रेमडेसिविर इंजेक्शन वाटप केले असल्याचा दावादेखील त्यांनी केला आहे.
आमदार डाॅ. विजयकुमार गावित यांनीदेखील जिल्हाधिकारी व माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर टीका केली. रघुवंशी यांनी पाच हजार इंजेक्शन कुठल्या आधारावर आणले व ते विकले, असा जाब विचारून त्यांनी या सर्व बाबींची चौकशी करण्याची मागणी आपण केली असल्याचे सांगितले.