प्लाझ्मा देण्यास अनेक जण तयार। मात्र जनजागृतीचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:31 IST2021-04-20T04:31:36+5:302021-04-20T04:31:36+5:30
नंदूरबार जिल्ह्यात मागील वर्षी या जीवघेण्या आजारांतून उपचाराअंती बरे होणाऱ्यांची संख्या लक्षणीय होती. तर मृत्यूची संख्याही कमी होती, मात्र ...

प्लाझ्मा देण्यास अनेक जण तयार। मात्र जनजागृतीचा अभाव
नंदूरबार जिल्ह्यात मागील वर्षी या जीवघेण्या आजारांतून उपचाराअंती बरे होणाऱ्यांची संख्या लक्षणीय होती. तर मृत्यूची संख्याही कमी होती, मात्र यंदा मार्च महिन्यापासून बाधित रुग्णांचा आकडा विक्रमी गतीने वाढला सुरुवातीला शहरी भागात मर्यादित असलेला कोरोना आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात फैलावला आहे. धडगाव अक्कलकुवा व शहादा तालुक्यातील अतिदुर्गम भागांतील गाव-पाडे, वसाहती व छोट्या गावांमध्येही कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहे.
नंदुरबार जिल्हा रुग्णालय, शहादा व नवापूर येथील शासकीय कोविड केअर सेंटर यासह जिल्ह्यात सुमारे खासगी डॉक्टरांकडून शासकीय मान्यतेनुसार कोविड केअर सेंटर चालविण्यात येत असून येथे बाधित रुग्णांवर उपचार केला जात आहे. सध्या कोरोनाचा फैलाव पाहता शासकीय व खासगी या दोन्ही आरोग्य यंत्रणांवर कमालीचा ताण आला असून बेडची संख्या अपूर्ण पडत असल्याने अनेकांनी जिल्ह्याबाहेर राज्याबाहेर उपचार घेण्यास प्राधान्य दिले आहे. प्रामुख्याने प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या तुलनेत बाधित रुग्णांचा संख्या सर्वाधिक असल्याने संपूर्ण आरोग्य यंत्रणा सध्या तरी कोलमडली आहे. या सर्व उपचार केंद्रांवर जागतिक आरोग्य संघटना आयसीएमआर व वैद्यकीय क्षेत्रातील ज्ञानानुसार उपचार केले जात आहेत उपचाराअंती बरे झालेल्यांची संख्याही आता समाधानकारक आहे.
राज्यात व देशात पारंपरिक उपचारपद्धतीसह प्लाझ्मा थेरपीद्वारे बाधित रुग्णांवर उपचार केले जात आहे प्लाझ्मा थेरपीमुळे बाधित रुग्ण लवकर बरा होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र, नंदुरबार जिल्ह्यात शासकीय व खासगी पातळीवर प्लाझ्मा थेरपीचा उपयोग बाधितांवर उपचारासाठी होत नाही. मुळात प्लाझ्मा थेरपीचा वापर केला तर बरे होणाऱ्यांची संख्या कमालीची वाढणार आहे. कारण कोविडमधून बरे झाल्यानंतर आपल्या रक्तामध्ये कोविड अँटीबॉडीज तयार होतात. अशावेळी आपण हे रक्त दान केल्यास रक्तातील प्लाझ्मा घटकांद्वारे इतर कोविड रुग्णावर उपचार होऊन त्या रुग्णाचा जीवदेखील वाचू शकतो. यासाठी जिल्हा प्रशासनाने बाधितांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना प्लाझ्मा थेरपीबाबत योग्य ते प्रशिक्षण देऊन जिल्ह्यात प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे.
प्लाझ्मा दान कोण करू शकतं?
● तुमची कोविड चाचणी पॉजिटीव्ह आली होती.
● कोविडमधून पूर्णतः बरे होऊन किंवा लस घेऊन तुम्हाला २८ दिवस झाले आहेत आणि आज कोविडची कुठलेही लक्षणे नाहीत.
● तुमचे वय १८ ते ५० वर्षे दरम्यान आहे.
● अगोदर रक्तदान केलं होत.
● हिमोग्लोबिन १२.५ % पेक्षा जास्त आहे.
● तुमचे वजन ६० कि.ग्रॅ. पेक्षा जास्त आहे.
● उच्च रक्तदाब/मधुमेह/कर्करोग/किडनी प्रत्यारोपण/गंभीर हृदयरोग/टी.बी./गंभीर शस्त्रक्रिया/गरोदर यापैकी तुम्हाला आजार/अवस्था नाही.