मांजणीपाडा व मुरवाणीपाडा ग्रामस्थांनी प्रथमच पाहिले अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 12:39 IST2020-11-02T12:38:58+5:302020-11-02T12:39:06+5:30

n  लोकमत न्यूज नेटवर्क धडगाव :  तालुक्यातील सीमावर्ती व अतिदुर्गम भागातील गावाना जाण्यासाठी धड रस्ते नाहीत, अशा डोंगर माथ्यावर ...

Manjanipada and Murwanipada villagers saw the officer for the first time | मांजणीपाडा व मुरवाणीपाडा ग्रामस्थांनी प्रथमच पाहिले अधिकारी

मांजणीपाडा व मुरवाणीपाडा ग्रामस्थांनी प्रथमच पाहिले अधिकारी

n  लोकमत न्यूज नेटवर्क
धडगाव :  तालुक्यातील सीमावर्ती व अतिदुर्गम भागातील गावाना जाण्यासाठी धड रस्ते नाहीत, अशा डोंगर माथ्यावर वसलेल्या मांजणीपाडा व मुरवाणीपाडा येथे स्वातंत्र्यानंतर प्रथमच १० किमी पायपीट करत तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांनी पाड्यांवर जावून नागरिकांना रेशन कार्डाचे वाटप करीत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या वेळी प्रशासनाच्या लोकाभिमुख भूमिकेमुळे आदिवासी बांधव भारावून गेल्याचे चित्र पहायला मिळाले.
      शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशनकार्ड अत्यंत महत्वाचे मानले जाते. मात्र तालुक्यातील दुर्गमभागातील बऱ्याच नागरिकांकडे अद्यापपर्यंत रेशनकार्ड नाही. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांना शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागते. तसेच अनेकदा कागदपत्रांच्या अपूर्णतेमुळे कार्यालयात खेटे मारूनही रेशनकार्ड मिळण्यास अडचणी निर्माण होतात. या सर्व प्रकारात दुर्गम भागातील आदिवासी नागरिकांचा वेळ व पैसा दोन्हीही मोठ्या प्रमाणात खर्च होतो. यातून त्यांना मनस्ताप होवून त्यांचा प्रशासनावरील विश्वास कमी होतो.
तालुक्यातील सीमावर्ती भागात दळण-वळणाच्या साधनांचा मोठ्या प्रमाणावर अभाव आहे. अनेक गाव-पाड्यांवर जाण्यासाठी रस्तेच नाहीत, अशा परिस्थितीत तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे हे आपल्या कार्यालयातील कर्मचार्यांसह तब्बल १० किलोमीटरची पायपीट करत तोरणमाळ ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या झापी ग्रामपंचायतीतील अतिदुर्गम मांजणीपाडा व मुरवाणीपाड्यावर पोहोचले.
४५० लोकवस्तीच्या डोंगरमाथ्यावर वसलेल्या मांजणीपाडा व मुरवाणीपाडा या पाड्यांवर पोहोचण्यासाठी तहसिदारांना जीप, बोट व पायी प्रवास करावा लागला. चारही बाजूने जंगल व खोल दऱ्या व डोंगरमाथ्यावर हे पाडे वसलेले आहे. तीव्र चढावाचा डोंगर पायी चढून पाड्यावर आलेल्या तहसीलदारांना पाहून ग्रामस्थांना आश्चर्याचा धक्काच बसला. स्वातंत्र्यानंतर प्रथमच एखादा प्रशासकीय अधिकारी पायपीट करत आपल्या पाड्यावर आल्याने नागरिक भारावून गेले होते.
या वेळी १५० कुटुंबांना तहसीलदार सपकाळे, जिल्हा परिषद सदस्य  गणेश पराडके यांच्या हस्ते रेशन कार्डाचे वाटप करण्यात आले. तहसीलदारांनी पाड्यांवर चौफेर फिरून विविध समस्या जाणून  घेतल्या. या वेळी सपकाळे म्हणाले की, गावात आधारकार्ड नसलेल्या लोकांसाठी आधार कॅम्प लावला जाईल, तसेच वनपट्टे धारकांना लवकरच आदेशांचे वाटप करण्यात येईल. गावात पिण्याच्या पाण्यासाठी विहीर मंजुरीसाठी, गावातील स्वस्त धन्य लाभार्थ्यांना गावातच स्वस्त        धन्य दुकान मंजूर करण्यात येईल. तसेच प्रयत्न करणार असल्याचेही ते या वेळी म्हणाले. गावातील नागरिकांनी खावटी योजना, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ       सारख्या योजनेचा लाभ घ्यावा. मांजणीपाडा व मुरवाणीपाडाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहाय्य            केले जाईल असेही सपकाळे यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिले.
या वेळी जिल्हा परिषद सदस्य गणेश पराडके, विजय ब्राम्हणे              यांनीही मनोगत व्यक्त करत तहसीलदार सपकाळे यांनी राबविलेल्या प्रशासन आपल्या दारी या उपक्रमाचे कौतुक केले. या वेळी तोरणमाळ गटाचे जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख   गणेश पराडके, विधानसभा                       संघटक विजय ब्राम्हणे, मंडळ अधिकारी विठ्ठल उकर्डे, मधुकर सूर्यवंशी, अव्वल कारकून मिथून राठोड, पुरवठा लिपिक पी.एस.               ईशी, ग्रामविकास अधिकारी            डी.डी. पाटील, तलाठी शांतीलाल आहेर, अझर काझी, पोलीस पाटील उतरान्या नाईक, चंद्रसिंग नाईक, आमशा पावरा, रूपसिंग पावरा, मुंगीलाल नाईक, वडदा पावरा, पिंटू वळवी, सुनील भोई आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Manjanipada and Murwanipada villagers saw the officer for the first time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.