मॅनेजरने लावला बँकेला 70 लाखांचा चुना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 18:50 IST2018-03-03T18:50:00+5:302018-03-03T18:50:00+5:30
बँक ऑफ इंडिया : लोणखेडा शाखेतील प्रकाराने खळबळ

मॅनेजरने लावला बँकेला 70 लाखांचा चुना
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 3 : बँक मॅनेजरनेच बँकेला व ठेवीदाराला 70 लाखांचा चूना लावल्याची घटना लोणखेडा, ता.शहादा येथील बँक ऑफ इंडिया शाखेत घडली. याप्रकरणी विद्यमान मॅनेजरच्या फिर्यादीवरून तत्कालीन मॅनेजरविरुद्ध फसवणुकीसह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंकुश सत्यपाल छाब्रा असे बँक मॅनेजरचे नाव आहे. छाब्रा यांच्याकडे जून 2014 ते जुलै 2015 या कालावधीत शाखेचा मॅनेजरपदाचा कार्यभार होता. या काळात त्यांनी बँकेचे ठेवीदार किर्ती विरेंद्र पाटील यांची ठेवची 13 लाख 83 हजार 520 रुपये रक्कम हडप केली. 16 शेतकरी खातेदार यांच्या नावे असलेली पीक कर्जाची रक्कम बोगस रेकॉर्ड तयार करून वाढीव दाखवून त्यातून त्यांनी 55 लाख 94 हजार 714 रुपये काढून घेतले. याशिवाय बँकेकडून घरभाडे डिपॉङिाटसाठी घेतलेले 25 हजार रुपये देखील भरणा केला नाही. असा एकुण 70 लाख तीन हजार 234 रुपयांचा अपहार करून बँकेची फसवणूक केल्याची बाब उघडकीस आली.
याबाबत विद्यमान मॅनेजर योगेश अशोकराव पाचोरकर यांनी वरिष्ठांच्या सुचनेनुसार फिर्याद दिल्याने शहादा पोलिसात अंकुश छाब्रा यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरिक्षक शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार डी.एच.बागुल करीत आहे.