जिल्ह्यात कुपोषण आकडा जास्तच- केंद्रीय मंत्री भारती पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:34 IST2021-08-20T04:34:39+5:302021-08-20T04:34:39+5:30
जिल्ह्यातील कुपोषणाबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, जिल्ह्यात आजअखेरीस तीन हजार ४३९ सॅम तर १८ हजार ६५१ मॅम बालके आहेत. ...

जिल्ह्यात कुपोषण आकडा जास्तच- केंद्रीय मंत्री भारती पवार
जिल्ह्यातील कुपोषणाबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, जिल्ह्यात आजअखेरीस तीन हजार ४३९ सॅम तर १८ हजार ६५१ मॅम बालके आहेत. व्हीसीडीसी, एनआरसी, पोषण आहार आदी सुविधा या बालकांना दिल्या जात आहेत. प्रत्येक बालकाचे स्क्रिनिंग करुन घेणे सक्तीचे केले आहे. कुपोषण मुक्तीसाठी नंदुरबार जिल्ह्याचा पाच कोटी रुपयांचा निधी पडून आहे. पालकमंत्री तसेच जिल्हा प्रशासनाने केंद्र शासनाकडे प्रस्ताव दिल्यास त्यांना हा निधी मिळू शकणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
तिसऱ्या संभाव्य लाटेत कुपोषित बालकांना सर्वाधिक धोका असल्याने त्यांचे पोषण वाढून शारीरिक क्षमता बळकट व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्न करत असल्याची माहितीही डाॅ. भारती पवार यांनी दिली.
दरम्यान उत्तरे देताना राज्य शासनाकडून जनआशीर्वाद यात्रेबाबत करण्यात आलेल्या टीकेवर पलटवार करताना केंद्रीय राज्यमंत्री डाॅ. पवार यांनी सांगितले की, लोकसभेत नवीन मंत्र्यांची ओळख परिचय करू न दिल्याने आणि त्यांच्या कार्याची माहिती होऊ न दिल्याने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाने राज्यात जनआशीर्वाद यात्रा काढली आहे. यातून लोकांमध्ये जाऊन काय काम करणार याची माहिती देणार आहोत. ही यात्रा कोविड नियमांचे पालन करूनच होत असून जनता आशीर्वाद देण्यासाठी येत असल्याने यात्रा सफल झाल्याचे शेवटी त्या म्हणाल्या.
पत्रकार परिषदेस खासदार डाॅ. हीना गावित, आमदार अशोक उईके, भाजप अनुसूचित जाती विभागाचे प्रांत संयोजक किशोर काळकर, माजी आमदार शिरीश चाैधरी, भाजप जिल्हाध्यक्ष विजय चाैधरी उपस्थित होते.