रेशनमध्ये आता मका व ज्वारीही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 12:05 IST2021-02-15T12:05:16+5:302021-02-15T12:05:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यतील अंत्योदय व प्राधान्य कुटूंबांना तब्बल १३ हजार २२७९ क्विंटल ज्वारी व १५ हजार ...

Maize and sorghum are now in the ration | रेशनमध्ये आता मका व ज्वारीही

रेशनमध्ये आता मका व ज्वारीही

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यतील अंत्योदय व प्राधान्य कुटूंबांना तब्बल १३ हजार २२७९ क्विंटल ज्वारी व १५ हजार ३५० क्विंटल मका  तर काही ठिकाणी ५१.५० क्विंटल बाजरी देखील वाटप केली जाणार आहे. मार्च महिन्यात हे नियोजन असून अवघ्या एक रुपये किलो प्रमाणे त्याचे वाटप केले   जाणार आहे. जिल्ह्यातील जवळपास दोन लाख ७६ हजार कुटूंबांना याचा लाभ होणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागातर्फे देण्यात आली. 
गेल्या वर्षी व यंदा मोठ्या प्रमाणावर ज्वारी, मका  खरेदी करण्यात आला होता. तो शासकीय गोदामांमध्ये पडून आहे. त्यामुळे अंत्योदय व प्राधान्य कुटूंबांना त्याचा लाभ मिळावा यासाठी रेशनकार्ड धारकांना त्याचे वितरण गहू व तांदूळ प्रमाणे होणार आहे. मार्च महिन्यात त्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी नंदुरबार जिल्ह्यात ज्वारी तब्बल १३ हजार २७९ क्विंटल तर मका १५ हजार ३५० क्विंटल उपलब्ध आहे. याशिवाय काही ठिकाणी बाजरी देखील अर्थात ५१.५० क्विंटलपर्यंत उपलब्ध आहे.  
तालुकानिहाय भरड  धान्य पुढील प्रमाणे खरेदी करण्यात आले होते. नंदुरबार तालुक्यात ज्वारी १० हजार ७६५ तर मका सहा हजार २६० क्विंटल, नवापूर तालुक्यात ज्वारी ६४.५० क्विंटल तर मका एक हजार ९३७ क्विंटल, तळोदा तालुक्यात     २३६ क्विंटल ज्वारी तर २२.५० क्विंटल मका, अक्कलकुवा तालुक्यात ८७ क्विंटल ज्वारी तर ६० क्विंटल  मका, धडगाव तालुक्यात ५६ क्विंटल ज्वारी तर ६६५ क्विंटल मका व    शहादा तालुक्यात दोन हजार ७० क्विंटल ज्वारी तर सहा हजार ४०५ क्विंटल मका खरेदी करण्यात आला होता. याशिवाय शहादा तालुक्यात ५१.५० क्विंटल  बाजरी देखील खरेदी करण्यात आली होती. 
मार्च महिन्यात गव्हाऐवजी  ज्वारी, मका व बाजरी दिली जाणार आहे. अंत्यद्योय व प्राधान्य कुटूंबांना ज्या प्रमाणे दर महिन्याला गहू व   तांदूळ वाटप केेले जाते त्याचप्रमाणे  हे भरड धान्य द्यावे लागणार  आहे. 
सर्वच रेशन धान्य दुकानांना हे भरड धान्य पुरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. लाभार्थींनी आपल्या रेशन दुकानातून ते खरेदी करावे असे आवाहन देखील जिल्हा पुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे. 
लॅाकडाऊन आणि कोरोनाच्या काळात प्राधान्य व अंत्योदय     कुटूंबांना मोठ्या प्रमाणावर रेशनचा धान्याचा लाभ मिळाला होता. एप्रिल    ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत त्याचे  वितरण केले जात होते. त्यामुळे अनेकांचे संसार सुरळीत सुरू  राहिले. 
आता तांदूळ व गहू ऐवजी ज्वारी व मका दिला जाणार असल्याने अशा कुटूंबांची आणखी सोय होणार  आहे.

केवळ एक रुपया...
अवघ्या एक रुपये किलो दराने ज्वारी व मका लाभार्थी कुटूंबांना दिला जाणार आहे. अंत्योदय योजनेतील कुटूंबाला १५ किलो मका व ज्वारी तर प्राधान्य कुटूंबाला दोन किलो मका व ज्वारी प्रत्येकी दिली जाणार आहे. बाजारात सद्या या दोन्ही भरड धान्याचे भाव यापेक्षा पाच ते सहा पटीने आहे.

रेशन दुकानात प्राधान्य व अंत्योदय कुटूंबांना भरड धान्याअंतर्गत ज्वारी व मका वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. काही ठिकाण बाजरीही दिली जाणार आहे. मार्च महिन्याच्या नियतनात त्याचा समावेश राहणार आहे. लाभार्थी कुटूंबांनी त्याचा लाभ घेणे आवश्यक आहे. 
-महेश शेलार,
जिल्हा पुरवठा अधिकारी, नंदुरबार.

Web Title: Maize and sorghum are now in the ration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.