शहाद्यात मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटाविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 12:22 IST2020-02-28T12:22:13+5:302020-02-28T12:22:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : पालिका प्रशासनातर्फे गुरूवारी दुपारनंतर अचानक अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमण ...

शहाद्यात मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटाविले
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : पालिका प्रशासनातर्फे गुरूवारी दुपारनंतर अचानक अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमण काढण्यात येऊन रस्तावर उभ्या असणाऱ्या लॉरी धारकांवर ही कारवाई करण्यात आली.
शहरात दोन महिन्यापूर्वी पालिका प्रशासनातर्फे अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. तीन दिवस कारवाई करीत ही मोहीम सुरू होती. या कालावधीत अनेक अतिक्रमण काढण्यात आले. मात्र गेल्या काही दिवसापासून पुन्हा अतिक्रमण जैसे होत असल्याने पालिका प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत होता तर पालिका प्रशासनाने या मोहिमेत केवळ गरिबांचे अतिक्रमण काढले व धनिकांना संरक्षण दिले असा आरोप अतिक्रमणधारकांतर्फे केला जात असल्याने ही मोहीम वादात सापडली होती. या मोहिमेनंतर पुन्हा या ठिकाणी अतिक्रमण होत असल्याने पालिका प्रशासनाने ही मोहीम राबवून काय मिळवले असा प्रश्न सुज्ञ नागरिकांकडून उपस्थित केला जात होता. काही नगरसेवकांनी ही या मोहिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
गुरूवारी दुपारी चार वाजेनंतर मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्तात पालिका प्रशासनाने अचानक अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविली. यात मुख्य रस्ता, बस स्थानक परिसर, दोंडाईचा रोड, स्टेट बँक चौक, पंचायत समिती परिसर व महात्मा फुले पुतळा परिसरातील भाजीपाला विक्रेत्यांनी केलेले तात्पुरते अतिक्रमण मोहिदा रस्त्यावरील अतिक्रमण व बाजार चौक काझी चौक या भागातील अतिक्रमण काढण्यात आले. सुमारे दोन तास चाललेल्या या मोहिमेत मोठ्या संख्येने अतिक्रमण काढले गेले.
बसस्थानक परिसरात अतिक्रमण काढताना अतिक्रमण धारक व मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. पोलिसांनी व नागरिकांनी हस्तक्षेप केल्यानंतर मोठा अनर्थ टळला. अतिक्रमण काढताना पालिका प्रशासन दुजाभाव करत असल्याचा आरोप या वेळी अतिक्रमणधारकांनी केला. या मोहिमेत रस्त्यावर व्यवसाय करणाºया हातगाडी चालकांवर ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान अतिक्रमण निर्मूलन पथक काझी चौकात आले असताना या ठिकाणी एका सलून धारकाने अतिक्रमण करून या परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृह पाडून टाकत पक्के बांधकाम केल्याने याबाबत पालिका प्रशासनाकडे नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. या भागाची पाहणी मुख्याधिकाऱ्यांनी करून सोमवारपर्यंत सदरचे पक्के बांधकाम स्वखर्चाने काढून घेण्याचे आदेश संबंधित सलून चालकास दिले.
गुरूवारच्या मोहिमेत मुख्याधिकारी राहूल वाघ यांच्यासह स्वच्छता निरीक्षक राजू चव्हाण, मिळकत व्यवस्थापक सचिन महाडिक, नगररचना अभियंता स्वप्निल वाडिले, सहायक अभियंता आशिष महाजन, अस्थापणा प्र.चेतन गांगुर्डे, सहाय्यक गोटू तावडे, बाधकाम सहायक अजिंक्य डोडवे, पोलीस प्रशासन, नगरपालिका अधिकारी, कर्मचारी, आरोग्य विभागातील कर्मचारी मोहिमेत सामील होते.