प्रेमीयुगुलाचे दिल मांगे मोअर, बापाच्या जिवाला मात्र घोर
By Admin | Updated: May 7, 2014 08:05 IST2014-05-07T01:48:11+5:302014-05-07T08:05:27+5:30
प्रेमाला वयाचे, जातीपातीचे आणि धर्माचे बंधन नसते. प्रेमात आंधळे झाल्याचे अनेक किस्से पहायला मिळतात.

प्रेमीयुगुलाचे दिल मांगे मोअर, बापाच्या जिवाला मात्र घोर
जळगाव : प्रेमाला वयाचे, जातीपातीचे आणि धर्माचे बंधन नसते. प्रेमात आंधळे झाल्याचे अनेक किस्से पहायला मिळतात. असाच किस्सा मंगळवारी पहायला मिळाला. गेंदालाल मिल भागातील एक प्रेमीयुगुल मंगळवारी दुपारी दुचाकीवर फिरायला निघाले. कानळदा रस्त्यावर फिरत असलेल्या या प्रेमीयुगुलावर मुलीच्या बापाची नजर पडली. भंबेरी उडालेले दोघे दुचाकी सोडून पळाले. काही वेळेनंतर वडील आणि प्रियकर यांच्यात हाणामारी होऊन प्रकरण शहर पोलीस स्टेशनपर्यंत आले. गेंदालाल मिल भागातील तरुणीचे याच भागातील एका तरुणासोबत प्रेमप्रकरण सुरू आहे. खाजगी दुकानावर काम करणार्या वडिलांना मुलगी घरात न दिसल्याने त्यांनी तिचा शोध सुरू केला. शोध घेत असताना ते कानळदा रस्त्यावर आले. या ठिकाणी दोघेजण एका दुचाकीवर फिरताना त्यांना दिसले. मुलगी आणि तिच्या प्रियकराला जिवाच्या आकांताने थांबविण्याचा प्रयत्न केला. प्रियकरासोबत आपल्याला पकडल्यानंतर वडील मारतील या भीतीने तिने गाडीवरून उडी मारून पळायला सुरुवात केली. मुलगी पळाली म्हटल्यावर मुलानेदेखील दुचाकी जागेवर सोडून पळ काढला. वडिलांनी धापा टाकत पुन्हा घर गाठले. काही वेळेनंतर घराबाहेर पडल्यानंतर मुलीचा प्रियकर योगायोगाने तहसील कार्यालयाजवळ दिसला. दोघांची या ठिकाणी झटापट झाली. त्यानंतर प्रियकर व मुलीचे वडील आपापल्या मार्गाने रवाना झाले. त्यानंतर वडिलांनी शहर पोलीस स्टेशन गाठत मुलाविरुद्ध तक्रार नोंदविली. थोड्या वेळेनंतर डोक्याला पट्टी बांधलेल्या अवस्थेत प्रियकर पोलीस स्टेशनला आला. त्याच्यासोबत त्याची प्रेयसी, आई व शेजारी होते. मुलीच्या वडिलांकडून जीवाला धोका असल्याचे सांगत अटक करण्याची मागणी प्रियकर पोलिसांकडे करू लागला. मुलीनेदेखील लग्न याच मुलाशी करणार असा हट्ट धरला. प्रियकर जेथे जाईल तेथे आपण जाऊ असा हट्ट धरल्यानंतर पोलीस हतबल झाले. मुलगी लग्नाला तयार असली तरी तिचे वडील मात्र आपल्या जिवावर उठले असल्याचे सांगत मुलाने लग्न करण्यास नकार दिला. दोन्ही बाजूचा गोंधळ पाहून सेवानिवृत्तीकडे झुकलेल्या एका पोलीस कर्मचार्याने तरुणीला वडिलांना समजावण्यास सांगितले. मात्र गोंधळ सुरुच असल्याने पोलिसांनी दोघांना बाहेर थांबून विचारविनियम करण्यास सांगितले. काही वेळेनंतर दोघांनी आमची तक्रार नसल्याचे सांगितल्याने त्यांना समज देण्यात आली.