शहादा तालुक्यातील धांद्रे खुर्द व उभादगड आदिवासीबहुल गावांमध्ये ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:36 IST2021-09-07T04:36:46+5:302021-09-07T04:36:46+5:30

जयनगर : दीड वर्षांपासून कोरोना महामारीमुळे शाळा बंद असल्यामुळे पहिली ते सहावीच्या मुलांचे चांगलेच शैक्षणिक नुकसान होत आहे. सध्या ...

Loss of students due to online education in Dhandre Khurd and Ubhadgad tribal-dominated villages in Shahada taluka | शहादा तालुक्यातील धांद्रे खुर्द व उभादगड आदिवासीबहुल गावांमध्ये ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान

शहादा तालुक्यातील धांद्रे खुर्द व उभादगड आदिवासीबहुल गावांमध्ये ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान

जयनगर : दीड वर्षांपासून कोरोना महामारीमुळे शाळा बंद असल्यामुळे पहिली ते सहावीच्या मुलांचे चांगलेच शैक्षणिक नुकसान होत आहे. सध्या आठवी ते १२ वीचे वर्ग चालू आहेत. मात्र, गेल्या दीड वर्षापासून पहिली ते चौथीचे वर्ग अजून चालू झाले नाही. त्यामुळे आदिवासीबहुल वस्तीतील प्राथमिक शाळेतील मुलांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे.

शहादा तालुक्याच्या पूर्वेला १७ किलोमीटर अंतरावर असलेल्या जयनगर जवळील धांद्रे खुर्द व उभादगड या आदिवासी बहुल गावांमधील विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षणामुळे खूप मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे. एकतर या आदिवासी बहुल गावांमध्ये पुरेशा प्रमाणात नेटवर्क नाही. शिवाय येथील विद्यार्थ्यांच्या पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल नसल्यामुळे ऑनलाईन शिक्षण म्हणजे काय? हे देखील दीड वर्षात अजून पालक व विद्यार्थ्यांना उमगलेले नाही. फक्त महामारी चालू आहे. त्यामुळे शाळा बंद आहेत. एवढेच या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना समजत आहे. मात्र, ऑनलाईन शिक्षण म्हणजे काय? ते कसे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचते? पीडीएफ म्हणजे काय? झूम ॲप, एम.एस. टीम ॲप म्हणजे काय? या शब्दांविषयी आदिवासी बहुल गावांमधील विद्यार्थी व पालकांना समजत नाहीये.

धांद्रे खुर्द या गावामध्ये पहिली ते सहावीपर्यंत व उभादगड या गावामध्ये पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग असून, दीड वर्षापासून पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेचे दार अजूनही उघडले गेले नसल्याने या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात असून, भविष्यात शिक्षणाच्या बाबतीत आपल्या मुलांचे काय होईल? याची चिंता या आदिवासीबहुल गावातील पालकांना सतावत आहे. म्हणून शिक्षण विभागाने या आदिवासीबहुल विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणाच्या काळात फुल नाहीतर, फुलाची पाकळी तरी शिक्षणाच्या बाबतीत करायला हवे, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.

उन्हाळ्याचे खेळ पावसाळ्यात

धांद्रे खुर्द व उभादगड येथील मुलांना फक्त खेळ आणि खेळच सध्या तरी माहित आहे. शाळा बंद असल्यामुळे उन्हाळ्यात खेळले जाणारे खेळही ते सध्या पावसाळ्यात खेळत आहेत. यामध्ये मग गोट्या, भोवरा, विटी-दांडू या सारखे खेळ मुले सध्या खेळताना दिसत आहे. अभ्यास, पाटी-पेन्सिल, वही-पेन हे शब्दही दीड वर्षापासून त्यांच्या कानावर पडलेले नाहीत. म्हणून केवळ खेळ खेळण्याबरोबर शाळा बंद असल्यामुळे मुलांचा आयुष्याचा खेळ होताना दिसत आहे.

Web Title: Loss of students due to online education in Dhandre Khurd and Ubhadgad tribal-dominated villages in Shahada taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.