पाण्याच्या शोधात येणाऱ्या बिबट्याचे होतेय दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 20:33 IST2019-04-25T20:32:52+5:302019-04-25T20:33:10+5:30
तळोद्यातील ग्रामस्थांमध्ये भिती : हलालपूर शिवारात हिंस्त्र प्राण्यांची समस्या

पाण्याच्या शोधात येणाऱ्या बिबट्याचे होतेय दर्शन
कोठार : तळोदा तालुक्यातील हलालपूर येथे मागील आठ दिवसांपासूनच बिबट्यांचा धुमाकूळ सुरू आहे़ परिसरातील पाणवठे कोरडे झाले असल्याने पाण्याच्या शोधात हिस्त्र जनावरे गावाकडे धाव घेत असल्याचे यातून दिसून येत आहे़ त्यामुळे ग्रामस्थांकडून भिती व्यक्त करण्यात येत आहे़
हलालपूर परिसरात सुुरुवातीला शेतशिवारांमध्ये अनेक वेळा बिबट्यांसह अनेक हिंस्त्र प्राण्यांचे दर्शन झाले होते़ परंतु आता हे प्राणी गावापर्यंत येत असल्याने ग्रामस्थांची चिंता वाढली असल्याचे दिसून येत आहे़ अनेक पाण्याचे स्त्रोत कोरडे झाले असल्याने पाण्याच्या शोधात प्राणी गावात येत असतात़
मागील आठ दिवसांपासून हलालपूर गावात बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून वनविभाग मात्र याबाबत अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे.
तळोदा तालूका हा सातपुड्याच्या पायथ्याशी असल्याने परिसरातील अनेक गावांच्या शेतशिवारात बिबट्यासह अन्य हिंस्त्र प्राण्यांचा वावर असल्याचे दिसून येते. साधारणत: ऊस, केळी, यांच्यासारख्या पिकांमध्ये बिबट्या, तरस, अस्वल यांसारखे प्राण्यांच्या अधिवास असल्याचे सातत्याने निदर्शनात आले आहे.
उसतोड पूर्ण होऊन अनेक शेते रिकामी झाली असल्याने अधिवास व पाण्याच्या शोधात वन्य प्राणी गावाकडे धाव घेत असल्याचे दिसून येत आहे़
हिंस्त्र प्राण्यांचा वावर वाढल्याने बचावासाठीच्या उपाययोजनाचे प्रशिक्षण शेतकरी व स्थानिक नागरीकांना वनविभागाकडून मिळणे गरजेचे आहे. शिवाय कोणतेही हिंस्त्र प्राणी आठळून आले तर कोणती खबरदारी घ्यावी व काय उपाययोजना कराव्यात याबाबत तरी जनजागृती होणे अपेक्षित आहे.