तिघांच्या आत्महत्येने लोंढरे गाव सुन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:19 IST2021-07-24T04:19:28+5:302021-07-24T04:19:28+5:30

शहादा तालुक्यातील लोंढरे येथील शेतकरी नथा बुधा वाघ (५६) हे पत्नी सखुबाई नथा वाघ (५१) आणि मुलगा ...

Londhare village was devastated by the suicide of three people | तिघांच्या आत्महत्येने लोंढरे गाव सुन्न

तिघांच्या आत्महत्येने लोंढरे गाव सुन्न

शहादा तालुक्यातील लोंढरे येथील शेतकरी नथा बुधा वाघ (५६) हे पत्नी सखुबाई नथा वाघ (५१) आणि मुलगा गोपाल नथा वाघ (३०) यांच्यासह गुरुवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घरात बामखेडा ता. शहादा येथील वृक्ष मंदिर येथे जाऊन बोराडी येथे भावाकडे जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले होते. लहान भाऊ धनराज वाघ यांना तशी माहिती त्यांनी दिली होती. घरात किरकोळ वाद झाल्याने ते मुलगा आणि पत्नी या दोघांसह घराबाहेर पडले होते. दरम्यान, बामखेडा येथे न जाता तिघांनी थेट गिधाडे पूल गाठून आधी विषारी औषध प्राशन केले व त्यानंतर तापी नदीत उडी मारून आत्महत्या केली. दरम्यान, एकाने तिघांना आत्महत्या करताना पाहिल्याने हा प्रकार समोर आला. दरम्यान, मुलगा गोपाल याची मोटारसायकल गिधाडे येथे आढळून आल्याने तिघांची ओळख पटली होती.

तिघांनी आत्महत्या करण्याच्या घटनेला १८ तासांपेक्षा अधिक कालावधी उलटला असला, तरीही अद्याप त्यांचे मृतदेह हाती आलेले नाहीत. गुरुवारी जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे तापी नदीपात्रात पाण्याची पातळी वाढली आहे. यातून तिघांचा मृतदेह शोधण्यास पोलीस प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही. तिघांचा मृतदेह शोधण्याची मोहीम सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

नथा वाघ यांना दोन मुले, एक मुलगी असून दोनही मुलांचे लग्न झाले आहे. दोघा भावांचा वेगवेगळा संसार सुरू होता. नथा वाघ व त्यांच्या पत्नी सखुबाई ह्या लहान मुलगा गोपाल वाघ याच्यासोबत राहत असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, घरात वाद झाल्याने नथा वाघ, सखुबाई आणि गोपाल यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु, नेमका वाद कशावरून झाला, याची माहिती मात्र मिळालेली नाही. त्यांच्या कुटुंबीयांना रात्री उशिरा माध्यमांद्वारे ही माहिती मिळाल्यानंतर कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर गाव सुन्न झाले. गावचे पोलीस पाटील शांतिलाल रोकडे यांनीही या घटनेची माहिती शहादा पोलीस ठाण्यात दिली. पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली असलोद दूरक्षेत्राचे कालुराम चौरे, पोलीस काॅन्स्टेबल दीपक परदेशी, विश्वास साळुंखे, अमृत पाटील यांनी गावात जाऊन मयतांच्या कुटुंबीयांची भेट घेत माहिती दिली.

Web Title: Londhare village was devastated by the suicide of three people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.