परवानाधारक रिक्षा चालकांना महिनाभरापासून लागली मदतीची आस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:31 IST2021-05-09T04:31:29+5:302021-05-09T04:31:29+5:30

नंदुरबार : परवानाधारक रिक्षा चालकांना राज्य सरकारने दीड हजार रुपये मदत देण्याचे जाहीर केले असले तरी जिल्ह्यात त्याबाबत काहीही ...

Licensed auto rickshaw drivers have been hoping for help for over a month | परवानाधारक रिक्षा चालकांना महिनाभरापासून लागली मदतीची आस

परवानाधारक रिक्षा चालकांना महिनाभरापासून लागली मदतीची आस

नंदुरबार : परवानाधारक रिक्षा चालकांना राज्य सरकारने दीड हजार रुपये मदत देण्याचे जाहीर केले असले तरी जिल्ह्यात त्याबाबत काहीही हालचाल नाहीत. जिल्ह्यात अवघे ३५० परवानाधारक रिक्षाचालक आहेत. उर्वरित साडेतीन हजार रिक्षा चालकांकडे परवाना नाहीत. त्यामुळे त्यांना या मदतीपासून वंचित राहावे लागणार आहे.

संचारबंदी काळात रिक्षा वाहतूक बंद आहे. त्यामुळे रिक्षा चालकांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. गेल्या वर्षी देखील दोन महिन्याचे लाॅकडाऊन व त्यानंतरही वेळोवेळी लावण्यात आलेले निर्बंध यामुळे रिक्षा चालकांचे हाल झाले. हातावर पोट असणाऱ्या काही कुटुंबांना तर मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले. निर्बंध शिथिल झाल्यावर देखील रिक्षामध्ये दोन पेक्षा अधिक प्रवासी बसत नव्हते. त्यामुळे व्यवसायावर पूर्णत: परिणाम झाला.

अनेक रिक्षा चालक हे शालेय विद्यार्थी वाहतूक करतात त्यांना तर इतर व्यवसाय शोधावा लागला. कारण वर्षभर शाळा बंद होत्या. मध्यंतरी शाळा सुरू झाल्या, तरीही विद्यार्थी वाहतुकीला परवानगी देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे शाळा सुरू होऊन देखील काहीही उपयोग झाला नव्हता.

अनेक रिक्षा चालकांनी कर्ज काढून रिक्षा घेतल्या होत्या. परंतु वर्षभरापासून व्यवसायच होत नसल्याने बॅंकाचे हप्ते थकले. कर्ज वाढले. त्यामुळे अनेक रिक्षाचालकांनी थेट रिक्षा विकून दुसरा व्यवसाय निवडला. कुणी भाजी विक्री सुरू केली, कुणी दुसरीकडे कामाला लागले तरी कुणी इतर व्यवसाय शोधला.

यंदाच्या कोरोना संचारबंदीत राज्य शासनाने परवानाधारक रिक्षा चालकांना दीड हजार रुपये मदत देण्याचे जाहीर केले. थेट रिक्षा चालकांच्या बॅंक खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे. परंतु या घोषणेला आता महिना होण्यात आला, तरीही काहीही हालचाल झालेली दिसत नाही. त्यामुळे रिक्षा चालक या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

जिल्ह्यात एकूण चार हजारापेक्षा अधिक रिक्षाचालक आहेत. त्यातील केवळ साडेतीनशे जणांकडेच परवाना असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे जवळपास साडेतीन हजार रिक्षा चालकांना या मदतीचा काहीही उपयोग होणार नाही. त्यामुळे सरसकट सर्वच रिक्षा चालकांना मदतीची हात राज्य शासनाने द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शिवाय मिळणाऱ्या मदतीची रक्कम देखील वाढवून मिळावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

राज्य शासनाने रिक्षा चालकांना मदत जाहीर केली तरी त्याबाबत अद्याप काहीही हालचाली नाहीत. केवळ परवानाधारक रिक्षा ऐवजी सरसकट सर्व रिक्षा चालकांना या मदतीचा लाभ झाला पाहिजे.

-किरण गवळी, अध्यक्ष, नेताजी रिक्षाचालक संघटना, नंदुरबार.

Web Title: Licensed auto rickshaw drivers have been hoping for help for over a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.