आडगावच्या रेशन दुकानाचा परवाना रद्द करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 11:58 IST2020-03-21T11:58:15+5:302020-03-21T11:58:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील आडगाव येथील रेशन दुकानदार मापात पाप करीत असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात ...

आडगावच्या रेशन दुकानाचा परवाना रद्द करावा
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील आडगाव येथील रेशन दुकानदार मापात पाप करीत असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात या रेशन दुकानदाराचा परवाना रद्द करावा, या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना ग्रामस्थांतर्फे देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, आडगाव येथील रेशन दुकानदार पार्वतीबाई सायसिंग रावताळे या दुकानात १२ मार्च रोजी धान्य वाटप सुरू असताना गहू, तांदळाचे मोजमाप करताना प्रत्येक लाभार्थीला तीन ते पाच किलो धान्य कमी देत असल्याचे निदर्शनास आले. ग्रामस्थांनी याबाबत विचारणा केली असता दादागिरीची भाषा वापरुन तुम्ही माझे काहीच करु शकत नाही, असे म्हटले व माल वाटप कमी प्रमाणात देत होते. त्यावेळेस गावकऱ्यांनी सामूहिक निर्णय घेऊन रेशन वाटप बंद केले व वजन काटा व कमी असलेल्या धान्याच्या पिशव्या उपसरपंच परशुराम ठाकरे व उपस्थित ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीमध्ये जप्त केले. दुसºया दिवशी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहानिशा केली असता त्यांनाही कमी धान्य वाटप होत असल्याचे निदर्शनास आले. या दुकानदाराच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करुन रेशन दुकानदार श्रीमती पार्वतीबाई सायसिंग रावताळे यांचा रेशन दुकानाचा परवाना रद्द करण्यात यावा, ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे.