चला, पुन्हा एकदा निर्मितीचे स्वप्न साकारूया...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:21 IST2021-07-21T04:21:22+5:302021-07-21T04:21:22+5:30

नंदुरबार जिल्हा निर्मितीला २३ वर्षे पूर्ण झाली असून २४ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. मानवी जीवनात २४ वे वर्ष ...

Let's make the dream of creation come true once again ... | चला, पुन्हा एकदा निर्मितीचे स्वप्न साकारूया...

चला, पुन्हा एकदा निर्मितीचे स्वप्न साकारूया...

नंदुरबार जिल्हा निर्मितीला २३ वर्षे पूर्ण झाली असून २४ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. मानवी जीवनात २४ वे वर्ष तसे महत्त्वाचे मानले जाते. कारण या वयात माणूस स्वावलंबनाचा व स्वनिर्मितीचा ध्यास धरून वाटचाल करतो. तीच अवस्था नंदुरबार जिल्ह्याचीही आहे. या २३ वर्षांच्या काळात जिल्ह्याने सक्षम होण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यावेळेस जिल्ह्याची निर्मिती झाली, त्यावेळी हा भाग राज्यातील सर्वात मागास भाग म्हणून परिचित होता. परंतु जिल्हा निर्मितीनंतर जिल्हा मुख्यालय जवळ आल्याने अनेक समस्यांवर मात करीत परिपूर्ण होण्याचा प्रयत्न सुरू आहे. याच प्रयत्नाच्या काळात गेले दीड वर्ष कोरोनाने थांबवले होते. सर्व स्वप्ने धूसर झाली होती. दिशा हरवायला लागली होती. परंतु कितीही संकटे आली तरी थांबायचे नाही, हा या भागातील मानवी स्वभाव आहे. त्याच भूमिकेतून आता पुन्हा एकदा धीटपणे कोरोनाला सामोरे जात स्वप्नांचा पाठलाग करायचा आहे.

गेल्या २३ वर्षांत जिल्ह्यात सिंचन, उद्योग, शेती, शिक्षण, आरोग्य या सर्वच क्षेत्रात आम्ही काही ना काही प्रगती केली आहे. शिक्षणाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास, दुर्गम पाड्यांपर्यंत शिक्षणाची ज्योत लावण्यासाठी प्रयत्न यशस्वी होत आहेत. केवळ साक्षरतेचाच ध्यास नव्हे, तर डिजिटल शिक्षणाची कास आम्ही धरली आहे. जिल्हा परिषदेच्या एक हजार ३८६ शाळांपैकी जवळपास एक हजार शाळा डिजिटल बनल्या आहेत. शासकीय आश्रमशाळांमध्येदेखील गुणवत्तेचा दर्जा व इतर दर्जा सुधारण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. विशेषत: बहुतांश आश्रमशाळा या दुर्गम भागात असल्याने अनेक शाळांना इमारतींचा प्रश्न होता. या इमारती बांधण्यासाठी जागेचीही अडचण होती. कारण अनेक शाळांच्या जागेला वन कायद्याची अडसर होती. पण त्यातूनही मार्ग काढून आता इमारती उभ्या होऊ लागल्या आहेत. कोरोनाच्या काळातच गेल्या दीड वर्षात जवळपास १५ शासकीय आश्रमशाळांचे बांधकाम पूर्ण झाले असून १० इमारतींचे बांधकाम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांसाठीदेखील या दीड वर्षाच्या काळात सुमारे चार कोटींचा खर्च करून अनेक वर्गखोल्या बांधल्या आहेत.

शिक्षणाबरोबरच आरोग्य सुविधांचा विस्तारही वाढत आहे. या दीड वर्षाच्या काळात कोरोनामुळे अनेक आरोग्याच्या सुविधा आम्हाला उभ्या करता आल्या. पाच कोटी खर्चाच्या ट्रामा सेंटरची इमारत उभी राहिली असून नवीन पुन्हा ४९ रुग्णवाहिका आल्या आहेत. याशिवाय ॲम्ब्युलन्सवर पर्याय म्हणून बाईक ॲम्ब्युलन्सची यंत्रणा सुरू केली आहे. दुर्गम भागात १० बाईक ॲम्ब्युलन्स उपलब्ध केल्या आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनेक वर्षांपासून स्वप्न असलेले वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले आहे. त्याच्या बांधकामासाठी ५३२ कोटींचा निधीही मंजूर झाला आहे. १० नवीन आरोग्य केंद्रांच्या इमारती झाल्या.

उद्योग क्षेत्रातही एमआयडीसीची उभारणी सुरू आहे. नवापूर आणि नंदुरबारात हे सेंटर उद्योगयुक्त करण्यासाठी प्रयत्न असून अनेक मोठे उद्योग आता येऊ पाहत आहे. टेक्स्टाईल पार्क आणि वैद्यकीय इक्वीपमेंट पार्क उभारण्याची तयारी सुरू झाली आहे.

सिंचन क्षेत्रात जिल्हा निर्मितीपूर्वी जिल्ह्यातील सिंचनाचे क्षेत्र जेमतेम साडेसात टक्क्यांपर्यंत होते. आता ते १५ टक्क्यांपर्यंत पोहोचले असून त्यातही सारंगखेडा, प्रकाशा, दरा या मध्यम प्रकल्पांची उभारणी झाली आहे. त्यांचे पाणी शेतापर्यंत पोहोचविण्याची तयारी सुरू आहे. काही अडथळे असले तरी, या योजना कार्यान्वित होताच सिंचनाचे क्षेत्र ३२ टक्क्यांपर्यंत पोहोचेल. उकई आणि नर्मदेचे पाणी आणण्याच्या योजनाही तयार आहेत. राजकीय इच्छाशक्तीचा वरदहस्त मिळताच या योजना कार्यान्वित झाल्यानंतर सिंचनाचे क्षेत्र ५२ टक्क्यांपर्यंत पोहोचेल.

रस्त्यांचे जाळे विणले जात आहे. पूर्वी अनेक गावांपर्यंत रस्ते नव्हते. आता ही संख्या मात्र कमी झाली असून दुर्गम-अतिदुर्गम भागातही तोरणमाळपासून, तर नर्मदाकाठापर्यंत आता रस्ता झाला आहे. अनेक पाड्यांना पायी जाण्याऐवजी आता वाहनाने जाता येते. त्यामुळे दळणवळणाची सुविधा विस्तारत आहे. विजेच्याबाबतीतही असेच चित्र आहे. पूर्वी दुर्गम भागात वीज नव्हती. पण आता ती पोहोचू लागली आहे. रोजगाराचा प्रश्न असल्याने स्थलांतर वाढले असले तरी, ते सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यंदा कोरोनाच्या काळात ६० हजार मजुरांना रोहयोअंतर्गत प्रशासनाने काम दिले. तीच गती कायम ठेवण्यासाठी नियोजन सुरू आहे.

अर्थात प्रत्येक क्षेत्रात विकासाची व्याप्ती वाढत असल्याने, पूर्वी ज्या समस्या होत्या, त्या आता हळूहळू कमी होत आहेत. अनेक क्षेत्रात या भागातील तरुण आपले नावलौकिक करीत आहेत. गुणवत्ता वाढल्याने सर्वच क्षेत्रात अगदी दुर्गम भागातील तरुणही आपल्या गुणवत्तेने समाजाला नवी दिशा देण्याचे काम करीत आहेत. या भागातील तरुण आयएएस झाले, एम.डी., एम.एस. झाले, उत्कृष्ट अभियंते झाले आहेत, संशोधक झाले आहेत, न्यायाधीश झाले आहेत. वकिलीच्या क्षेत्रात राज्यातच नव्हे, तर देशपातळीवर नावलौकिक करीत आहेत. अनेक तरुण देश-विदेशात आपपाल्या क्षेत्रात नैपुण्य कमवत आहेत. क्रीडा क्षेत्रातही या भागातील खेळाडूंनी उंच भरारी घेतली आहे. किसन तडवी असो, की अनिल वसावे, यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर सातपुड्याची ख्याती नेली आहे. कृषी क्षेत्रातही येथील अनेक शेतकरी सातासमुद्रापार आपला उत्पादित केलेला माल पाठवीत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून येथील केळी युरोप आणि आखाती देशात निर्यात होत आहेत. त्यामुळे आमचाही आत्मविश्वास आता बळावला आहे. स्वप्नांच्या पंखात बळ भरले आहे. पण अजूनही जगाची बरोबरी साधण्यासाठी खूप काही करावे लागणार आहे, याचीही आम्हाला जाणीव आहे. आहे ती कमी पूर्ण करून गेल्या दीड वर्षापासून थांबलेली आमची प्रगती साधण्यासाठी पुन्हा एकदा सर्व शक्तिनिशी व एकजुटीने काम करावे लागणार आहे. त्यासाठी जिल्हा सज्ज होत आहे. जगाच्या बरोबरीने धावण्यासाठी अनेक स्वप्ने उराशी बाळगली आहेत. निर्मितीचा ध्यास सुरू आहे. त्यामुळे हे सारे स्वप्न साकारण्यासाठी आता विशिष्ट गतीची आवश्यकता असून त्या गतीने धावण्यासाठी आता प्रयत्नांची गरज नक्कीच आहे.

Web Title: Let's make the dream of creation come true once again ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.