सुलवाडे परिसरात बिबट्याचा वावर; वन विभागाने लावला पिंजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:36 IST2021-09-14T04:36:16+5:302021-09-14T04:36:16+5:30
सुलवाडे परिसरात मोठ्या प्रमाणावर शेती असून सुलवाडे प्राथमिक केंद्राच्या आवारात शुक्रवारी रात्री कुत्रे भुंकत असल्याचा आवाज आला. जवळच असलेल्या ...

सुलवाडे परिसरात बिबट्याचा वावर; वन विभागाने लावला पिंजरा
सुलवाडे परिसरात मोठ्या प्रमाणावर शेती असून सुलवाडे प्राथमिक केंद्राच्या आवारात शुक्रवारी रात्री कुत्रे भुंकत असल्याचा आवाज आला. जवळच असलेल्या आरोग्यसेविका शोभा भामरे यांच्या निर्दशनास आल्यावर त्यांनी बाहेर येऊन पाहणी केली असता अंधार जास्त प्रमाणात असल्याने त्यांना काही दिसून आले नाही. परंतु सकाळी उठल्यावर मोकाट फिरत असलेल्या घोड्यावर हिंस्त्र प्राण्याने हल्ला चढवून घोडा ठार केल्याची बाब लक्षात येताच कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. वन विभागाला याची माहिती दिली. सोमवारी वनक्षेत्रपाल सचिन खुणे, वनरक्षक अमर पावरा, वनरक्षक राधेश्याम वळवी, वनरक्षक अमोल गावीत, वनमजूर कांतीलाल वळवी, फोवज्या ठाकरे या ठिकाणी पिंजरा घेऊन दाखल झाले. बिबट्या असल्याच्या पाऊलखुणा आढळून आल्यावर या परिसरात बिबट्या असल्याची खात्री पटल्यावर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शेजारी पिंजरा लावण्यात आला. वन अधिकाऱ्यांनी सुलवाडे येथील नागरिकांना सायंकाळी विशेषत: रात्री नागरिकांनी एकटे घराबाहेर पडू नये, लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्यावी, पाळीव जनावरांना सुरक्षित जागी ठेवावे, परिसरातील लाईट सुरु ठेवावेत आदी सूचना केल्या. या वेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.