विधिमंडळ समितीने अक्कलकुव्यातील कामकाजावर व्यक्त केली नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:36 IST2021-09-08T04:36:41+5:302021-09-08T04:36:41+5:30
विधानमंडळ सचिवालयाच्या महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समितीच्या अध्यक्षा आमदार सरोज अहिरे, आमदार सुमन पाटील, आमदार यामिनी ...

विधिमंडळ समितीने अक्कलकुव्यातील कामकाजावर व्यक्त केली नाराजी
विधानमंडळ सचिवालयाच्या महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समितीच्या अध्यक्षा आमदार सरोज अहिरे, आमदार सुमन पाटील, आमदार यामिनी जाधव यांचा समितीत समावेश होता.
गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात विधान मंडळाची समिती येणार असल्याने युद्धपातळीवर तयारी सुरू होती. प्रशासनाच्या वतीने समितीला कुठे पाहणीसाठी न्यावे याबाबत खलबते करून पाहणीची ठिकाणे आणि दौरा निश्चित करण्यात आला होता. सकाळपासूनच अधिकारी आणि कर्मचारी हे 'अटेन्शन'मध्ये होते. निश्चित वेळेची खातरजमा होत नव्हती, त्यामुळे अनेकांचे फोन समिती केव्हा येणार, कोण सदस्य आहेत, याबाबत विचारणा करण्यात गुंतली होते. सकाळी ११ वाजता दौऱ्याला सुरुवात होण्याची अपेक्षा होती. समितीने आधी तळोदा तालुक्यातील दौरा आटोपून सायंकाळी अक्कलकुवा येथील ग्रामीण रुग्णालयात पाऊल ठेवले. त्यांनी रुग्णालयातील बाल पोषण केंद्राची पाहणी करत येथील सोयी-सुविधांची माहिती जाणून घेतली. दरम्यान, केंद्रातील उपलब्ध औषधसाठ्याची पाहणी करत असताना एका कपाटात मुदत संपलेली ओआरएसची पाकिटे आढळली तसेच काही औषधांची मुदत ही सप्टेंबर महिन्याच्या ३१ तारखेला संपणार असल्याचे दिसून आले. मुदत संपणाऱ्या औषधांचे पुढे काय करणार याबाबत विचारणा केली. रुग्ण कक्षाच्या बाहेरील परिसरात अस्वच्छता दिसून आल्याने तीव्र स्वरूपात नाराजी व्यक्त केली. एकंदरीत दोन्ही मुद्द्यांमुळे अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. त्यानंतर समितीने बस स्थानक येथील महिला मदत केंद्र तसेच हिरकणी कक्षाला भेट दिली. येथे आगार प्रमुख रितेश फुलपगारे यांनी समितीला माहिती दिली. समिती येणार असल्यामुळे अनेक वर्षांपासून बंद असलेल्या मदत केंद्राची साफसफाई करण्यात आली होती, त्यामुळे समितीने कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली. याठिकाणी अधिकाऱ्यांकडून चुकीची माहिती समितीला देण्यात येऊन, न केलेल्या कृतीचा पाढा सांगण्यात आला. सोरापाडा येथील बालिकाश्रमाला समितीने भेट देऊन मुलींसोबत चर्चा केली. या ठिकाणी उपलब्ध संसाधनांची माहिती घेतली. येथील धान्य कोठारातील तसेच स्वयंपाकघरातील माहिती जाणून घेतली.
त्यानंतर संध्याकाळी सुमारे पावणेसात वाजेदरम्यान देवमोगरा पुनर्वसन येथील अंगणवाडी केंद्राला समितीने भेट दिली. यावेळी वीज नसल्याने संपूर्ण गावात अंधाराचे साम्राज्य होते. बॅटरीच्या प्रकाशात समितीने केंद्रात प्रवेश केला. तेथील माहिती जाणून घेतली. नंतर समितीने अंगणवाडी केंद्रातील स्वयंपाकघराची पाहणी केली. दरम्यान, पोषण आहार आणि आहाराचे वेळापत्रक याबाबत आवश्यक सूचना दिल्या. संपूर्ण दौऱ्यात महिला व बालविकास विभागाचे अप्पर सचिव कुमुटवार, उपायुक्त चंद्रशेखर पगारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौदळ, जिल्हा शल्य चिकित्सक रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी महेंद्र चव्हाण, तहसीलदार रामजी राठोड, गटविकास अधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी, आदी उपस्थित होते.